बोगस मतदारांची केली नोंदणी
By Admin | Updated: March 2, 2017 03:25 IST2017-03-02T03:25:43+5:302017-03-02T03:25:43+5:30
पटेल कंपाऊंड भागातील प्रभाग क्रमांक १७ च्या मतदारयादीत बोगस नावांची नोंदणी केल्याने त्याविरोधात बचाव संघर्ष समितीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

बोगस मतदारांची केली नोंदणी
भिवंडी : शहरातील पद्मानगर,फुलेनगर, वऱ्हाळदेवीनगर, पटेल कंपाऊंड भागातील प्रभाग क्रमांक १७ च्या मतदारयादीत बोगस नावांची नोंदणी केल्याने त्याविरोधात बचाव संघर्ष समितीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीस लक्ष्य करत भिवंडी ग्रामीण व भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्राच्या मतदारयादीत बोगस नावांची मोठ्या संख्येने नोंदणी झाली आहे.
ही नोंदणी करताना मतदारांच्या नावे गॅसपावती, घरपट्टी, वीजबील व आधारकार्ड अशी बोगस कागदपत्रे सादर केली आहेत.
या विरोधात हरकती अर्ज देऊनही निवडणूक कार्यालयाने दखलही घेतलेली नाही. मोर्चात शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने, ग्रामीण संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, महापौर तुषार चौधरी आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
>अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी संतोष थिटे यांना लेखी निवेदन देऊन मतदार यादीतील बोगस नावांची चौकशी करून ती कमी करण्याची मागणी केली. तसेच मतदारयादीत नावे दाखल करताना कागदपत्रांची शहनिशा न करता त्याची नोंद करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणीही मोर्चेकरांनी केली.