रिपाइंसह १६ पक्षांची नोंदणी रद्द
By Admin | Updated: September 30, 2015 02:44 IST2015-09-30T02:44:13+5:302015-09-30T02:44:13+5:30
निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या राज्यातील १६ पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यात खा.रामदास आठवले यांचा रिपाइं, खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचा समावेश आहे.

रिपाइंसह १६ पक्षांची नोंदणी रद्द
मुंबई : निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या राज्यातील १६ पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यात खा.रामदास आठवले यांचा रिपाइं, खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचा समावेश आहे.
सर्व राजकीय पक्षांना दरवर्षी लेखापरीक्षण आणि आयकर रिटर्न्स भरल्याचा दाखला निवडणूक आयोगाला सादर करणे अनिवार्य असते. मात्र, या व अन्य काही कागदपत्रांची पूर्तता न केल्याने आयोगाने विविध पक्षांना नोटीस बजावली होती. कागदपत्रांची पूर्तता मुदतीत न केलेल्या १६ पक्षांची नोंदणी आयोगाने रद्द ठरविली. त्यामुळे आमदार कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्षावरही नोंदणी रद्द होण्याची नामुष्की ओढावली आहे. या पक्षांना आता अपक्ष म्हणून लढावे लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, बसपा आणि मनसेला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता आहे. अन्य पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे झालेली आहे. (विशेष प्रतिनिधी)
---------------
मान्यता रद्द झालेले पक्ष : लोकभारती, खा.आठवलेंचा रिपाइं, स्वाभिमानी पक्ष, जनसुराज्य शक्ती, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया डेमॉक्रॅटिक, खोरिपा, जनशक्ती आघाडी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस, शिवराज्य पक्ष, सत्यशोधक समाज पक्ष, राष्ट्रवादी जनता पार्टी, मागासवर्गीय जनशक्ती पार्टी, इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, आॅल इंडिया क्रांतिकारी काँग्रेस.
-------------
नोटीसीशिवाय कारवाई
निवडणूक आयोगाने कोणतीही नोटीस न देता आमच्या पक्षाची नोंदणी रद्द केली याचे आश्चर्य वाटले. आज आयोगात जाऊन तांत्रिक बाबींची पूर्तता आम्ही केली आहे. त्यामुळे नोंदणी नक्कीच परत मिळेल याचा विश्वास वाटतो. राज्य निवडणूक आयोग केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी संबंधित असते.
- आ.कपिल पाटील, लोकभारती