जिल्हाधिकारी कार्यालयात लेखणीबंद !

By Admin | Updated: October 18, 2016 03:48 IST2016-10-18T03:48:01+5:302016-10-18T03:48:01+5:30

मुरबाड तहसीलदार कार्यालयात निवडणुकीचे काम करीत असलेल्या लिपिकास शिवसैनिकांनी मारहाण व शिवीगाळ केली

Registered in the office of the Collector! | जिल्हाधिकारी कार्यालयात लेखणीबंद !

जिल्हाधिकारी कार्यालयात लेखणीबंद !


ठाणे : मुरबाड तहसीलदार कार्यालयात निवडणुकीचे काम करीत असलेल्या लिपिकास शिवसैनिकांनी मारहाण व शिवीगाळ केली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. यामुळे कार्यालयात कर्मचारी आज दिवसभर बसून होते. त्यांनी कोणतेही काम केले नाही.
या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेने या आधीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, लेखणीबंद आंदोलन छेडून कर्मचाऱ्यांनी दिवसभर कोणतेही काम केले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात अपेक्षेने आलेल्या नागरिकांचे सोमवारी कोणतेही काम झाले नाही. यामुळे नागरिकांनीदेखील या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरत कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
मुदतीनंतर आलेला निवडणूक नमुना अर्ज गठ्ठ्यात न घेतल्यामुळे मुरबाड येथील लिपिक विलास तुंगार यांना वैशाखरे गावातील सचिन उल्हास घरत आणि विशाल सुभाष घरत या दोघांनी मारहाण केलेली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर या दोघांविरु द्ध गुन्हे दाखल केले असले तरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.

Web Title: Registered in the office of the Collector!