माध्यमात हवे बदलाचे प्रतिबिंब
By Admin | Updated: May 8, 2017 03:13 IST2017-05-08T03:13:08+5:302017-05-08T03:13:08+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये देशात आमूलाग्र बदल होत आहेत. शासन व्यवस्थेपासून समाजमनापर्यंत हे बदल होत आहेत. देशामधून भ्रष्टाचार हद्दपार

माध्यमात हवे बदलाचे प्रतिबिंब
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये देशात आमूलाग्र बदल होत आहेत. शासन व्यवस्थेपासून समाजमनापर्यंत हे बदल होत आहेत. देशामधून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना जनतेने स्वीकारल्या आहेत. यामधून एक नवी मानसिकता घडत आहे. देश बदलत असताना त्याचे प्रतिबिंब मात्र प्रसारमाध्यमांमध्ये दिसत नसल्याची खंत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज. स. करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जावडेकर यांचे ‘बदलता भारत आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ‘देशामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मोदी सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. ग्रामीण विकास, दिव्यांगांसाठी योजना, कृषी विमा, साक्षरता, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत योजना राबविल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
एकीकडे शालेय मुले स्वच्छ भारताचे दूत बनून गावकऱ्यांसह आई-वडिलांनाही स्वच्छतेचे धडे देत आहेत. आतापर्यंत एक लाखाहून अधिक गावे हगणदरीमुक्त झाली आहेत, तर दुसरीकडे लालबहादूर शास्त्रींच्या आवाहनावरून देशवासीयांना सोमवारी उपवास सुरू केले होते. मोदींच्या आवाहनानंतर सव्वा लाख नागरिकांनी गॅस सिलिंडरवरील सबसिडी सोडली.
उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरले. मायावतींनी भाजपाला मुस्लिम मते मिळणार नाहीत, असे म्हटले होते. मात्र, देशाची प्रगती आणि विकासात वाटा हवा असलेल्या नागरिकांनी भाजपाला मते दिली.
संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार संघाचे सदस्य लक्ष्मण मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सागर येवले यांनी आभार मानले.
...तर माध्यमे मागे पडतील
एलईडी दिव्यांनी वीजबचत होते, तसेच बिलही कमी येते. मात्र तीन वर्षांपूर्वी ३५० रुपये किंमत असणारे बल्ब आता ७० रुपयांना मिळत आहेत. सरकारने जगातल्या सर्व उत्पादकांना एकत्र बोलावून पाच वर्षांत १०० कोटी बल्बची आॅर्डर देतो, असे सांगत किमती कमी करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पूर्वी वैयक्तिक खिसे भरण्यासाठी ‘बार्गेनिंग’ व्हायचे; आता जनतेला किती देता यावर होते. मागील ७० वर्षांत व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी जे झाले नाही ते मोदी सरकारने लाल दिवे काढून करून दाखवले. मात्र, हे बदल प्रसारमाध्यमांना दिसत नाहीत. हे बदल टिपले नाहीत तर माध्यमे मागे पडतील, असे जावडेकर म्हणाले.