उजनीत पाणी सोडण्याबाबत फेरविचार करावा
By Admin | Updated: November 11, 2015 02:50 IST2015-11-11T02:50:23+5:302015-11-11T02:50:23+5:30
उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून

उजनीत पाणी सोडण्याबाबत फेरविचार करावा
पुणे : उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने यासंदर्भात फेरविचार करावा, असे पत्र जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले आहे.
१८ नोव्हेंबरपूर्वी पोलीस बंदोबस्ताअभावी कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडता येणार नाही, असेही त्यांनी पत्रात कळविले आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे विभागातील चासकमान धरणातून ३ टीएमसी, भामा आसखेडमधून ४, आंद्रा २ आणि मुळशी धरणातून १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे. सध्या उजनी धरणामध्ये ५३ टीएमसी मृत साठा व १३ टीएमसी उपयुक्त साठा असे एकूण ६७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. भामा आसखेड, चासकमान, आंद्र्रा आणि मुळशी धरणांत मिळून केवळ ४३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास ३० ते ४० टक्के पाणीसाठा कमी होणार आहे. याचा जिल्ह्णातील पिण्याचे पाणी व शेतीवर मोठा परिणाम होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.
उजनीत पाणी सोडण्यास खेड, शिरुर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातून मोठा विरोध आहे. शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेल्या नसल्याने पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी पाचर्णे यांनी केली, तर खेडचे आमदार सुरेश गोरे यांनीही धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला आहे. चासकमानमधून ३ टीएमसी पाणी सोडल्यास केवळ ३ टीएमसी पाणी शिल्लक राहील. त्यामुळे उन्हाळी दोन आवर्तने देता येणार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पाठविले आहे.