‘प्राथमिक’चे विषय कमी करणार
By Admin | Updated: April 22, 2015 04:12 IST2015-04-22T04:12:47+5:302015-04-22T04:12:47+5:30
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे काही विषय कमी

‘प्राथमिक’चे विषय कमी करणार
मुंबई : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे काही विषय कमी केले जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात सादर केले़
शिक्षण विभागाने हे प्रतिज्ञापत्र सादर केले़ ही समिती गेल्या वर्षी स्थापन करण्यात आली आहे़ इयत्ता पहिली व दुसरी तसेच तिसरी व पाचवी अशी विभागणी करून यातील काही विषय कमी केले जाणार आहेत.विषय कमी झाल्याने दप्तराचे ओझे कमी होईल़ चित्रकला व संगणक विषयाची वही शाळेत ठेवावी तसेच विद्यार्थ्यांना वह्या ठेवण्यासाठी लॉकर द्यावे, अशी सूचनाही शाळांना करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे़
या प्रकरणी चेंबूर येथील स्वाती पाटील यांनी अॅड. नीतेश नेवसे यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत कमालीची स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र तज्ज्ञ शिक्षक प्रत्येक शाळेत आहे. त्यामुळे दप्तरातील वह्या व पुस्तकांची संख्या वाढत चालली आहे. याआधी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक नव्हता. शिक्षक विद्यार्थ्यांची क्षमता बघूनच घरचा अभ्यास देत होते.
मात्र आता प्रत्येक शिक्षक त्याच्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना देत असतो. परिणामी, विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयांची वह्या व पुस्तके शाळेत घेऊन जावी लागतात. दप्तरांच्या ओझ्याने विद्यार्थ्यांना मानेचे व पाठीचे आजार होत असल्याचे केईएम रुग्णालयाने आधीच स्पष्ट केले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तरी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी न्यायालयानेच आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक शाळेत विद्यार्थ्याचे लॉकर असावे व तेथे त्यांची वह्या व पुस्तके राहतील. तसेच गणित-भूमिती व इतिहास-भूगोल या विषयांसाठी एकच वही असावी, अशा विविध सूचना करणारे परिपत्रक १९ एप्रिल २००६ रोजी शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला धाडले होते.
या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही सर्व शाळांना द्यावेत, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचे प्रत्युत्तर सादर करताना शासनाने वरील प्रतिज्ञापत्र सादर केले़ यावरील पुढील सुनावणी येत्या काही दिवसांत होईल़
(प्रतिनिधी)