बीटी कापसाचे दर कमी करा -खडसे
By Admin | Updated: June 3, 2015 03:14 IST2015-06-03T03:14:57+5:302015-06-03T03:14:57+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी बीटी कापूस बियाण्यांच्या उत्पादकांनी बियाण्यांचे दर १०० रुपयांनी कमी करावेत, असे आवाहन

बीटी कापसाचे दर कमी करा -खडसे
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी बीटी कापूस बियाण्यांच्या उत्पादकांनी बियाण्यांचे दर १०० रुपयांनी कमी करावेत, असे आवाहन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे केले. राज्य शासनाच्या आवाहनानंतरही बीटी कापुस बियाण्यांचे दर कमी झाले नाही तर राज्य शासन अधिसूचना काढून दर कमी करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील बीटी कापुस बियाण्यांचे दर कमी करण्याबाबत कृषिमंत्री खडसे यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषि आयुक्त विकास देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खडसे म्हणाले, दुष्काळ, गारपीट, अवेळी पाऊस या समस्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना बीटी कापुस बियाणे उत्पादक कंपन्यांनी ४५० ग्रॅमच्या पाकीटामागे १०० रुपयांनी दर कमी करून दिलासा द्यावा. बीटी कापुस बियाण्यांचे दर कमी झाले पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका आहे. बियाणे उत्पादकांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता दर कमी केले नाही तर बियाणे कमी दराने विकण्याबाबत अधिसूचना काढण्यात यावी, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)