रेल्वे हद्दीतील झोपड्यांचा पुनर्विकास होणार
By Admin | Updated: April 19, 2017 03:22 IST2017-04-19T03:22:47+5:302017-04-19T03:22:47+5:30
विमानतळ परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या धर्तीवर मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील सुमारे १२ लाख झोपडपट्टीवासीयांसाठी..

रेल्वे हद्दीतील झोपड्यांचा पुनर्विकास होणार
मुंबई : विमानतळ परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या धर्तीवर मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील सुमारे १२ लाख झोपडपट्टीवासीयांसाठी रेल्वे आणि एसआरए यांच्या संयुक्त उपक्रमातून पुनर्विकासाची योजना तयार करण्यात यावी, त्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली. तसा लेखी प्रस्ताव रेल्वेला तत्काळ पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई आणि महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबतची उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह मध्य आणि ‘परे’चे महाव्यवस्थापक, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक, नगरविकास, गृहनिर्माण, एसआरए आदी विभागांचे मुख्य सचिव उपस्थित होते.
मुंबईत मध्य रेल्वेच्या हद्दीत ३७.२५ हेक्टरवर झोपड्या असून, पश्चिम रेल्वेचा ४१.२ हेक्टर एवढा भूभाग झोपड्यांनी व्यापलेला आहे. येथील झोपड्यांसाठी पुनर्विकास योजनाच नाही. झोपडपट्टीवासीयांना घर मिळण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वाचे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्त्वत: याला मंजुरी दिल्याचे आ. आशिष शेलार यांनी सांगितले.