सप्तश्रृंगी गडावरील प्रवेश कराला जिल्हाधिका-यांचा रेड सिग्नल
By Admin | Updated: October 8, 2015 17:02 IST2015-10-08T17:01:51+5:302015-10-08T17:02:26+5:30
नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गडावर येणा-या भाविकांना प्रवेश कर आकारण्याचा स्थानिक ग्रामपंचायतीचा प्रस्ताव नाशिक जिल्हाधिका-यांनी फेटाळला आहे.

सप्तश्रृंगी गडावरील प्रवेश कराला जिल्हाधिका-यांचा रेड सिग्नल
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ८ - नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गडावर येणा-या भाविकांना प्रवेश कर आकारण्याचा स्थानिक ग्रामपंचायतीचा प्रस्ताव नाशिक जिल्हाधिका-यांनी फेटाळला आहे. याऐवजी ट्रस्टकडे येणा-या पैशांमधून पायाभूत सुविधा निर्माण करा असेही जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे.
सप्तश्रृंगी गडावर पायी येणा-या भाविकांसाठी प्रति माणसी दोन रुपये ऐवढा प्रवेश कर आकारण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायतीने घेतला होता. गडावर दरवर्षी १ कोटी भाविक येत असून सप्तश्रृंगी मंदिराला दरवर्षी सुमारे १५ कोटी रुपयांची देणगीही मिळते. येणा-या भाविकांसाठी पायाभूत सुविधा देणे आणि साफसफाई यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मंदिराकडे देणगी जमा होत असली तरी याचा वापर ग्रामपंचायतीला करता येत नाही असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. त्यामुळे गडावर येणा-या भाविकांसाठी प्रवेश कर किंवा प्रति वाहनामागे २० रुपये ऐवढा प्रवेश कर आकारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला होता. हा प्रस्ताव गुरुवारी जिल्हाधिका-यांनी फेटाळला आहे. याविरोधात ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्याची तयारी केल्याचे समजते.