राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत ‘रेड अलर्ट’
By Admin | Updated: March 1, 2017 05:22 IST2017-03-01T05:22:55+5:302017-03-01T05:22:55+5:30
मार्च ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये वाघांची शिकार होण्याची भीती केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने व्यक्त केली

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत ‘रेड अलर्ट’
गणेश वासनिक,
अमरावती- मार्च ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये वाघांची शिकार होण्याची भीती केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून वनकर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाघांना धोका निर्माण झाल्याचे केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या आठवड्यात कळविले आहेत. त्यानुसार केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने देशातील सर्वच व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांना वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मेळघाटसह ताडोबा, पेंच, बोर, नवेगाव बांध व नागझिरा या सहा व्याघ्र प्रकल्पांत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आले आहेत. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मार्च ते मे या तीन महिन्यांत सतत गस्त, सीमेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उन्हाळ्यात वाघांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करावेत. तसेच स्थानिकांच्या हालचालींवर करडी नजर ठेवताना व्याघ्र प्रकल्पांच्या सीमेलगतच्या गावात अनोळखी व्यक्ती निदर्शनास आल्यास त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गत पाच वर्षांतील उन्हाळ्यात जंगलांना आगी लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली असून वन्यप्राणीही दगावले आहेत.
या वेळीही उन्हाळ्यात तस्करांकडून जंगलांना आग लावणे, सापळा रचून वन्यपशूंची शिकार करणे, पाणवठ्यांवर विषप्रयोग करणे, ट्रॅपद्वारे वाघांची हत्या करणे आदीचे प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
>व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले आहे. सीमेवर तसेच तस्करांवर हे दल सतत लक्ष ठेवणार आहे. उन्हाळ्यात वन्यपशूंना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी १५ दिवसांत नवे पाणवठे तयार केले जाणार आहेत. - एम. एस. रेड्डी, क्षेत्र संचालक, मेळघाट.