अग्निशमन दलात होणार नोकरभरती
By Admin | Updated: July 4, 2016 02:40 IST2016-07-04T02:40:28+5:302016-07-04T02:40:28+5:30
महापालिकेच्या विशेष महासभेत पीठासीन अधिकारी यांनी विशेष समितीच्या सदस्यांची निवड केली.

अग्निशमन दलात होणार नोकरभरती
उल्हासनगर : महापालिकेच्या विशेष महासभेत पीठासीन अधिकारी यांनी विशेष समितीच्या सदस्यांची निवड केली. तसेच बारवी धरणग्रस्तांना पलिका सेवेत सामावून घेणे व अग्निशमन दलातील नोकरभरतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. शहर समस्यांचे आगार होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला.
उल्हासनगर महापालिका निवडणूक फेबु्रवारीमध्ये होणार आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विशेष समिती सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अग्निशमन दलात हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत कर्मचारी असल्याने भरतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर करत सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. बारवी धरणग्रस्त सहा जणांना पालिका सेवेत सामावून घेण्याचा ठरावही मंजूर झाला.
>पोलिसांना केले पाचारण
राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मनोज लासी यांच्यासह नगरसेवकांनी पोस्टर घेत शहर म्हणजे समस्यांचे आगार झाल्याचा आरोप केला. नगरसेवकांनी आयुक्त मनोहर हिरे यांचा मार्ग अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
युवराज भदाणे यांच्याकडील प्रभारी उपायुक्तपदाचा पदभार काढून टाकण्याची मागणी केली. राष्ट्रवादी नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस बंदोबस्त मागण्याची वेळ आयुक्तांवर आली.