पीककर्ज परतफेडीस १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
By Admin | Updated: June 30, 2015 03:42 IST2015-06-30T03:42:12+5:302015-06-30T03:42:12+5:30
पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली

पीककर्ज परतफेडीस १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई/ कोल्हापूर : पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळालेले नसल्याने जूनअखेर पीककर्जाची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या व्याजसवलत योजनेपासून मुकावे लागणार होते.
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी एक लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्यांना ० टक्के, तर तीन लाखांपर्यंतच्या कर्जाला दोेन टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; पण ही रक्कम एक वर्षाच्या आत म्हणजे जूनअखेर परतफेड केली, तरच या योजनेचा लाभ त्यांना मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांची बिले वेळेत मिळत नसल्याने जूनअखेर कर्जाची परतफेड करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यंदा तर उसाचे गाळप होऊन तीन महिने झाले, तरी अद्याप पैसे मिळालेले नाहीत. राज्यातील ७० टक्के शेतकरी थकीत गेला आहे. परिणामी त्याला व्याजसवलतीला मुकावे लागणार होते. त्यामुळे कर्ज परतफेडीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विकास सेवा संस्थांसह जिल्हा मध्यवर्ती बँकांनी राज्य सरकारकडे केली होती. अखेर शासनाने पीककर्ज परतफेडीची मुदत १५ आॅगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.
-----------------------------
जे साखर कारखाने एफआरपीप्रमाणे बिले देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी व पीककर्ज परतफेडीस मुदत वाढ द्यावी. या मागणीसाठी पुणे येथे आयुक्त कार्यालयावर ‘स्वाभीमानी’ने मोर्चा काढला होता. त्याची दखल घेऊन कर्ज परतफेडीस मुदतवाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- खासदार राजू शेट्टी
----------------------------------------
२०१३-१४चे राज्याचे पीक कर्जवाटप
16,462 Cr.
वाणिज्य बँका
1,611 Cr.
प्र्रादेशिक ग्रामीण बँका
13,354 Cr.
राज्य बँक, जिल्हा बँक, भूविकास बँक
केंद्राकडून दिले जाणारे पॅकेज येत्या चार-आठ दिवसांत कारखान्यांना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची पीक कर्जाची खाते भागेल.