फुकट्यांकडून १00 कोटींची वसुली
By Admin | Updated: April 8, 2015 01:52 IST2015-04-08T01:52:11+5:302015-04-08T01:52:11+5:30
विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेला नुकसानीला सामोरे जावे लागत असून, त्याविरोधात रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे

फुकट्यांकडून १00 कोटींची वसुली
मुंबई : विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेला नुकसानीला सामोरे जावे लागत असून, त्याविरोधात रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. या कारवाईत प्रवाशांवर दंड आकारण्यात येत असल्यामुळे रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळत आहे. मध्य रेल्वेने २0१४-१५मध्ये विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईत १०० कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले.
टीसी आणि रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने मध्य रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. ही कारवाई केल्यामुळे मध्य रेल्वेने चांगलाच दंडही वसूल केला आहे. २0१४-१५मध्ये केलेल्या कारवाईत २१ लाख ३१ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून, २0१३-१४मध्ये हीच संख्या १९ लाख ३७ हजार एवढी होती. २0१४-१५मध्ये केलेल्या कारवाईतून तब्बल १00 कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तर त्याआधीच्या आर्थिक वर्षात केलेल्या कारवाईतून ८७ कोटी २५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. जवळपास १५.७0 टक्के दंड वसुलीत वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेकडून करण्यात आलेली कारवाई सर्वांत मोठी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ या विभागांमध्ये मिळून कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. या विभागांतर्गत मध्य प्रदेश, कर्नाटक, इगतपुरी, बल्लारशहा अशी काही महाराष्ट्राबाहेरील ठिकाणेही येतात.