खर्च वसूल झालेले ६२ टोल बंद
By Admin | Updated: March 17, 2015 01:46 IST2015-03-17T01:46:13+5:302015-03-17T01:46:13+5:30
देशातील ६२ टोल प्लाझा मागील काही महिन्यांत बंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
खर्च वसूल झालेले ६२ टोल बंद
गडकरींची घोषणा : यापुढे सिमेंटचेच महामार्ग
नवी दिल्ली : ज्या रस्त्याच्या बांधकामासाठी १०० कोटींपेक्षा कमी खर्च झाला आहे व ज्यांचा खर्च टोलमधून वसूल झाला आहे, असे देशातील ६२ टोल प्लाझा मागील काही महिन्यांत बंद करण्यात आल्याची माहिती देतानाच महामार्गांची गुणवत्ता उत्तम ठेवण्यासाठी यापुढे सिमेंटचेच रस्ते बांधण्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली.
सिमेंट रस्त्यांमुळे खर्च वाढणार नसून, किमान १२० रुपये प्रति बॅग या दराने सिमेंट मिळणार असल्याने रस्त्यांची किंमत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर गडकरी यांनी त्यांच्या विभागाने सुरू केलेल्या नवीन वेब पोर्टलची माहिती दिली. जागतिक पातळीवरील नवे तंत्र रस्ते निर्माणासाठी वापरण्यात येईल, असे सांगून रस्त्यांची गुणवत्ता व त्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी सिमेंट रस्त्यांचा निर्णय घेतला आहे. देशातील ३६ सिमेंट कंपन्यांचे १०३ प्लांट आहेत. तेथून सिमेंट घेतले जाईल. त्यामुळे वाहतूक खर्चाचा बोजा व पर्यायाने किंमत कमी होईल.
या पोर्टलवर आलेल्या निविदांनुसार किमान दर १२० रुपये प्रतिबॅग असून, कमाल दर १५७ रुपये ठरला आहे. राज्य सरकारे, महापालिका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी हा दर कायम आहे.
आपल्या विभागाने यासाठी प्रथम पुढाकार घेतल्याने पायाभूत योजनांसाठी सिमेंट वापरण्यात येणार असल्याने यापुढे ३० टक्क्यांपर्यंत प्रकल्पांची किंमत कमी होईल. (विशेष प्रतिनिधी)
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, पीपीपी मॉडेलनुसार १०० कोटींपेक्षा कमी खर्च आलेले टोलनाके बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांवर यापुढे ई-टोल पद्धतही सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांना बँकेत पैसे भरल्यानंतर एक स्टिकर देण्यात येईल. हे स्टिकर वाहनावर लावल्यानंतर त्यांना टोलनाक्यांवर थांबण्याची व टोल भरण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.