विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
By विजय.सैतवाल | Updated: October 14, 2025 18:06 IST2025-10-14T18:05:02+5:302025-10-14T18:06:23+5:30
Silver Price Today: चांदीच्या भावातील नवनवीन उच्चांक दररोज गाठले जात असून मंगळवारी (१४ ऑक्टोबर) इतिहासात प्रथमच एकाच दिवसात चांदी १५ हजार रुपयांनी वधारली. या भाव वाढीसह चांदी एक लाख ९५ हजार रुपये अशा विक्रमी भावावर पोहचली आहे. दुसरीकडे सोन्याच्याही भावात दोन हजार ७०० रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख २७ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे.

विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - चांदीच्या भावातील नवनवीन उच्चांक दररोज गाठले जात असून मंगळवारी (१४ ऑक्टोबर) इतिहासात प्रथमच एकाच दिवसात चांदी १५ हजार रुपयांनी वधारली. या भाव वाढीसह चांदी एक लाख ९५ हजार रुपये अशा विक्रमी भावावर पोहचली आहे. दुसरीकडे सोन्याच्याही भावात दोन हजार ७०० रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख २७ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे.
जगभरात चांदीचा तुटवडा जाणवत असल्याने तिचे भाव दररोज वाढत आहे. या आठवड्यात तर चांदीमध्ये तीन वेळा मोठी भाववाढ नोंदली गेली आहे. पाच दिवसातील अंतराने दोन वेळा ११ हजार रुपयांनी वधारलेली चांदी मंगळवारी एकाच दिवसात थेट १५ हजार रुपयांनी वधारली. सुवर्ण बाजाराच्या इतिहासात मौल्यवान धातूमध्ये प्रथमच एका दिवसात एवढी वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे चांदी एक लाख ९५ हजार रुपये प्रति किलोवर पोहचून दोन लाख रुपयांच्या दिशेने झेप घेत आहे. एक किलो चांदीसाठी आता जीएसटीसह दोन लाख ८५० रुपये मोजावे लागणार आहे.
सोनेही उच्चांकी पातळीवर
चांदीसह सोन्याच्याही भावात मंगळवारी मोठी भाव वाढ झाली. सोमवारी एक लाख २४ हजार ७०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी दोन हजार ७०० रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख २७ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे. सोनेदेखील आता सव्वा लाखाच्या पुढे गेले असून एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह एक लाख ३१ हजार २२२ रुपये मोजावे लागणार आहे.
वाढत्या मागणीमुळे काही जणांकडून चांदीचा साठा केला जात आहे व वाढीव भावाने त्याची विक्री केली जात आहे. शिवाय चांदी ही जीवनावश्यक वस्तू नसल्याने त्यावर कोणत्याही देशाच्या सरकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे भाव नियंत्रण करणे शक्य होत नाही. चांदीची दिवसेंदिवस वाढत जाणारी गरज व मागणी यामुळे चांदीचे भाव तर वाढणारच आहे, शिवाय सोनेदेखील तेजीत राहणार आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सुवर्ण बाजार असोसिएशन
या महिन्यात सोने ११,००० तर चांदी ४९ हजाराने वधारली
दिनांक - सोने - चांदी
३० सप्टेंबर - १,१६,२०० - १,४६,०००
१ ऑक्टोबर - १,१८,२०० - १,४७,०००
८ ऑक्टोबर - १,२२,३०० - १,५२,८००
९ ऑक्टोबर - १,२३,६०० - १,६४,४००
११ ऑक्टोबर - १,२३,००० - १,६९,०००
१३ ऑक्टोबर - १,२४,७०० - १,८०,०००
१४ ऑक्टोबर - १,२७,४०० - १,९५,०००