बाष्पजल प्रक्रियेला मान्यता

By Admin | Updated: March 28, 2015 00:10 IST2015-03-27T21:51:03+5:302015-03-28T00:10:24+5:30

हापूसला दिलासा : युरोपातील निर्यातीचा मार्ग मोकळा

Recognition of the Steam Water Treatment | बाष्पजल प्रक्रियेला मान्यता

बाष्पजल प्रक्रियेला मान्यता

रत्नागिरी : फळमाशीचे कारण देत युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीवर बंदी घातली होती. यावर्षी अटीशर्थी ठेवत निर्यातीवरील बंदी उठवली होती. निर्यातीसाठी उष्णजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली होती. मात्र, अद्याप संशोधन पूर्ण होऊ शकले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.आंबा हे भारतातील नगदी पीक असून राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते. कोकणातील आंब्याची हापूस प्रजाती जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार, गुणवैशिष्ट्यांमुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही प्रजाती लोकप्रिय आहे. आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी वर्तवले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या प्रजातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु, यासंबंधी तातडीने अहवाल पाठवण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. परंतु, सध्या अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकऱ्यांनी बाजारपेठेत पाठवण्यास सुरूवात केली आहे. परंतु, उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्यास उशीर होणार असल्याने सध्या बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.
बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडे सत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याद्वारे हळुहळू तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. संबंधित प्रक्रिया वाशी येथे होत असल्यामुळे युरोपीय देशांनी त्यास मान्यता दिली आहे. वाशी मार्केटमधील ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर उष्णजलप्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात आला आहे.उष्णजलाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत बाष्पजल प्रक्रिया करूनच आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. २० ते २५ हजार पेट्या दिवसाला विक्रीला येऊ लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत आंबा निम्मा असला तरी दर मात्र घसरलेला दिसून येत आहेत. परदेशी आंबा निर्यात वाढली तर वाशी मार्केटमध्ये दर टिकतील, असा अंदाज शेतकरी वर्तवत आहेत. (प्रतिनिधी)


फळमाशीचे कारण देत घातली गेली होती आंबा निर्यातीवर बंदी.
वाशी मार्केटमध्ये ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर प्रक्रिया.
विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू.
तातडीने अहवाल पाठवणार.

Web Title: Recognition of the Steam Water Treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.