शिक्षणाचे पुनर्मूल्यांकन गुणवत्तेसाठी
By Admin | Updated: March 14, 2015 04:35 IST2015-03-14T04:35:19+5:302015-03-14T04:35:19+5:30
गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली

शिक्षणाचे पुनर्मूल्यांकन गुणवत्तेसाठी
मुंबई : गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.
विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देऊन सुरू करण्यात आलेल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अनुदानाअभावी प्रयोगशाळा, ग्रंथालये व इतर शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्रगतीवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेता विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिलेल्या सर्व माध्यमिक शाळांना चालू शैक्षणिक वर्षापासून १०० टक्के अनुदान देण्यात यावे अशा आशयाचा अशासकीय ठराव अस्लम शेख यांनी मांडला होता. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, विनाअनुदानित शाळांची फेरतपासणी सध्या थांबविण्यात आलेली असून, ती आता होणार नाही. तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांमध्ये फिरती प्रयोगशाळा, फिरती पुस्तकपेटी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
आढावा घेतल्यानंतर शाळांना अनुदान देण्याबाबत टप्प्याटप्प्याने सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.