रेल्वेच्या मागील इंजिनाला आग
By Admin | Updated: September 7, 2015 01:34 IST2015-09-07T01:34:11+5:302015-09-07T01:34:11+5:30
गोंदियावरून बालाघाटला जाणाऱ्या ट्रेनच्या मागील इंजिनला शनिवारी दुपारी आग लागली. गाडी गात्रा रेल्वे स्थानकात पोहोचताच सर्व प्रवाशांनी गाडीतून बाहेर धाव घेतली.

रेल्वेच्या मागील इंजिनाला आग
गोदिया : गोंदियावरून बालाघाटला जाणाऱ्या ट्रेनच्या मागील इंजिनला शनिवारी दुपारी आग लागली. गाडी गात्रा रेल्वे स्थानकात पोहोचताच सर्व प्रवाशांनी गाडीतून बाहेर धाव घेतली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
गोंदिया-बालाघाट गाडी नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी १२.२८ वाजता गोंदिया स्थानकावरून बालाघाटच्या दिशेने रवाना झाली. ही गाडी गात्रा स्थानकावर पोहोचण्याआधीच गाडीच्या मागील बाजूस असलेल्या इंजिनमधून धूर येताना दिसला. गाडी गात्रा स्थानकावर पोहोचेपर्यंत इंजिनने पेट घेतला होता. या आगीची खबर प्रवाशांना लागल्याने गाडी थांबताच त्यांनी बाहेर उड्या घेतल्या. प्रवाशांना पुढे घेऊन जाण्यासाठी गोंदियावरून दुसरी गाडी पाठविण्यात आली. या घटनेमुळे बालाघाटवरून गोंदियाला येत असलेल्या गाडीला बिरसोला रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आले. ही गाडीही जवळपास २ तास बिरसोला रेल्वे स्थानकावर अडकून पडली होती.
आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती घेतली जात आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे गोंदिया रेल्वेस्थानकाचे स्टेशन व्यवस्थापक (वाणिज्य) मुकेश कुमार यांनी सांगितले.