रिकामावेळ व्यसनांची खरी जननी - मकरंद अनासपुरे
By Admin | Updated: January 18, 2017 21:54 IST2017-01-18T21:54:17+5:302017-01-18T21:54:17+5:30
सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते. तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य लवकरच संपते, मुख्यत्वे रिकामा वेळ व आळस हीच व्यसनांची जननी आहे.

रिकामावेळ व्यसनांची खरी जननी - मकरंद अनासपुरे
>ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि.18 - सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते. तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य लवकरच संपते, मुख्यत्वे रिकामा वेळ व आळस हीच व्यसनांची जननी आहे. सतत क्रियाशील असलेल्या व्यक्तीला व्यसने करण्यास फारसा वेळ मिळत नाही. तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट, दारू यारख्या नकारात्मक व्यसनांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी वाचन, संगीत, स्वत:च्या कामाविषयीची निष्ठा यासारखी सकारात्मक व्यसने लावून घ्यावी, असा सल्ला प्रसिद्ध मराठी चित्रपट कलावंत तथा ‘नाम’ फाऊंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांनी दिला.
सर्च सामाजिक संस्था, शिक्षण विभाग, मुक्तिपथ अभियान व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दारू, तंबाखूमुक्तीचा संदेश व संकल्प, खर्रा, गुटखा, तंबाखूची सार्वजनिक होळी करून मुक्तिदिन पाळण्यात आला. सदर कार्यक्रम धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मकरंद अनासपुरे बोलत होते.
कार्यक्रमाला समाजसेवक तथा सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग, अमृत बंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.