स्मृतिदिनासाठी यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: November 17, 2014 04:30 IST2014-11-17T04:30:53+5:302014-11-17T04:30:53+5:30
१७ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सामान्य जनता येण्याची शक्यता आहे.

स्मृतिदिनासाठी यंत्रणा सज्ज
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त उद्या, १७ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सामान्य जनता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका, पोलीस तसेच शिवसैनिकांची व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनास प्रारंभ होईल. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी काही बदल करण्यात आले आहेत.
वाहने उभी करण्यास परवानगी असलेले रस्ते : संपूर्ण सेनापती बापट मार्ग, माहीम ते दादर, पाच उद्यान परिसर माटुंगा, लखमशी नप्पू रोड. वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग : स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, राजाबढे चौक जंक्शन ते केळस्कर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत, दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी, गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर, दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शनपर्यंत, बाळ गोविंददास मार्ग, पद्याबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट मार्गापासून
पश्चिम दिशेला लेडी जमशेटजी मार्गापर्यंत.
वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते : एस. व्ही. एस. रोड, केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे, दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकर मार्ग.
शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, महापौर, उपमहापौर व मान्यवर व्यक्तींसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील संयुक्त महाराष्ट्र दालनासमोरील शिवपुतळ््याशेजारील प्रवेशद्वारातून स्मृतिस्थळापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसैनिकांसाठी व इतर सर्वांसाठी समर्थ व्यायाम मंदिराकडून दर्शनरांगेतून प्रवेश दिला जाईल.
दर्शनरांगेतून येऊन स्मृती चौथऱ्यावर पुष्पांजली वाहण्याची व्यवस्था केली आहे. महानगरपालिकेच्या वतीने पाच ठिकाणी पाणपोईची व्यवस्था तसेच शिवाजी पार्क परिसरात शौचालये उभी केली असून, कबड्डी असोसिएशनच्या शेजारी तात्पुरत्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)