प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी 'फेस रीडिंग'
By Admin | Updated: March 21, 2017 03:50 IST2017-03-21T03:50:53+5:302017-03-21T03:50:53+5:30
राज्यभरात बारावीच्या परीक्षेत चार पेपर फुटल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पेपरफुटी प्रकरणाने बोर्डाची डोकेदुखी वाढली

प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी 'फेस रीडिंग'
मुंबई : राज्यभरात बारावीच्या परीक्षेत चार पेपर फुटल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पेपरफुटी प्रकरणाने बोर्डाची डोकेदुखी वाढली, याची पुनरावृत्ती विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होऊ नये म्हणून प्रश्नपत्रिकांची सुरक्षा वाढवण्यात आली. परीक्षा केंद्रात आॅनलाइनद्वारे प्रश्नपत्रिका पाठवूनही पेपरफुटी होण्याचा धोका असल्यामुळे प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी ‘फेस रीडिंग’ सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्याचबरोबरीने रेकॉर्डिंग आणि वॉटर मार्किंग सिस्टिमही तयार आहे.
व्हॉट्सअॅपचा वापर वाढल्यापासून परीक्षा काळात प्रश्नपत्रिकेची सुरक्षा हा यंत्रणेसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो. परीक्षेच्या काळात प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी विद्यापीठाने आॅनलाइन प्रश्नपत्रिका पाठवण्यास सुरुवात केली. तरीही यात काही त्रुटी राहिल्याने पेपरफुटीचे सत्र सुरू आहे. या वेळी हे टाळण्यासाठी फेस रीडिंग सिस्टिम सुरू केली आहे. प्रत्येक महाविद्यालयातील चार व्यक्तींचे फेस रीडिंग घेतले आहे. या चार जणांनाच आॅनलाइन आलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येणार आहे. विद्यापीठाच्या सिस्टिममधील फोटोशी चेहरा जुळला तरच पुढील प्रक्रिया सुरूहोईल.
फेस रीडिंग झाल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाइलवर एक लॉग इन आयडीचा मेसेज येईल. हा आयडी टाकल्यानंतरच प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. प्रश्नपत्रिका डाऊनलोड झाल्यानंतर त्याच खोलीत प्रिंटरवर प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट काढल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचे वाटप थेट वर्गात होेईल. यामुळे प्रश्नपत्रिकावाटपातील व्यक्तींचा समावेश कमी होणार आहे. या सर्व प्रक्रियेचा लाइव्ह व्हिडीओ काढला जाणार असून, तो थेट परीक्षा केंद्रातील कंट्रोल रूममध्ये प्रसारित होणार आहे. (प्रतिनिधी)