मूलभूत समस्यांना माथेरानकरांनी फोडली वाचा
By Admin | Updated: May 21, 2016 03:05 IST2016-05-21T03:05:52+5:302016-05-21T03:05:52+5:30
माथेरानमधील वीज, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग, मिनी बस अशा अनेक समस्या मांडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले

मूलभूत समस्यांना माथेरानकरांनी फोडली वाचा
नेरळ : माथेरानमधील वीज, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग, मिनी बस अशा अनेक समस्या मांडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला माथेरानकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परंतु या उपक्र माला एकही शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने माथेरानकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हे शासकीय अधिकारी किती जागरूक आहेत हे यावरून दिसून आले.
माथेरानमधील असेम्बली हॉलमध्ये शुक्रवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’चे हरून शेख यांनी प्रस्तावना करून या कार्यक्र माला सुरुवात केली. पाणीपुरवठ्यावर चर्चा करताना सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे म्हणाले, माथेरानला पाणीपुरवठा केली जाणारी पाइपलाइन आदिवासी लोक फोडत आहेत. जास्त प्रमाणात पाणी हॉटेलला व व्हीआपी लोकांना पुरविले जात असल्याने माथेरानकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून प्रचंड बिल आकारले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच २०१० मध्ये २४ कोटी रुपयांची मंजूर केलेली पाणी योजना पूर्ण झाली नाही. ई-रिक्षा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.
माथेरानमध्ये अनेक महिन्यांपासून महावितरणचा खेळखंडोबा सुरू असल्याने माथेरानकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे माथेरान मिनी ट्रेन मार्ग बंद झाला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तो पुन्हा तयार करण्यासाठी सुमारे १९ महिन्यांचा कालावधी लागला होता. त्यावेळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे माथेरानला माथेरान-धोधानी हा पर्यायी रस्ता होणे काळाची गरज असल्याचे अरविंद शेलार यांनी यावेळी सांगितले.
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकला तरच बंद केलेली मिनी ट्रेन सुरु होईल व माथेरानचा विकास होईल, असे माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत नमूद केले. माथेरानच्या समस्या जाणून घेतल्यानंतर ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी माथेरानमध्ये २० वर्षांपासून जाणवत असलेल्या समस्या अधिकाऱ्यांची झोप उडेल अशा पध्दतीने मांडण्यात येतील व सहा महिन्यांत अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न ‘लोकमत’च्या माध्यमातून केले जातील, असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक कुलदीप जाधव, सुनील शिंदे, प्रकाश सुतार, प्रवीण कोळंबे, प्रदीप घावरे, शकील पटेल, नागेश कदम, चंद्रकांत काळे, शिवाजी शिंदे, गणेश सुतार, सूर्यकांत कारडे, ‘लोकमत’ परिवारातील सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
विकासाला लागली नजर
च्माथेरानच्या विकासाला नजर लागली असून, माथेरानची लोकसंख्या दर दहा वर्षांनी कमी होत आहे. अनेक माथेरानकरांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे व अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे माथेरानचा विकास भकास झाल्याचे माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी या उपक्र मात सांगितले.