आरबीआयचे अधिकारीच सुट्टीवर
By Admin | Updated: November 13, 2016 21:52 IST2016-11-13T21:52:00+5:302016-11-13T21:52:00+5:30
केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँक कर्मचा-यांनी शनिवारी, रविवारी सुट्टी असताना नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले.

आरबीआयचे अधिकारीच सुट्टीवर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँक कर्मचा-यांनी शनिवारी, रविवारी सुट्टी असताना नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले. मात्र नोटा बदलून घेण्यासाठी देशातील कोट्यावधी नागरिक बँकांसमोर रांगा लावून उभे असताना रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय)अधिका-यांनी सुट्टी घेतली,त्यामुळेच बँकांपर्यंत पैसे पोहचले नाहीत,असा आरोप करत आॅल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांंनी शासनाचे या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर देशातील सर्व नागरिक आणि बँक कर्मचा-यांनी सहकार्याची भूमिका दाखवत बँकांचे व्यवहार सुरू केले. नोटा बंदच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार बँक कर्मचा-यांनी सुट्टी रद्द करून शनिवारी व रविवारी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत काम केले. नागरिकांनी संयम दाखवत निमुटपणे बँकांच्यासमोर रांगा लावल्या. मात्र आरबीआयकडून बँकांकडे रक्कम न आल्याने ती नागरिकांना देता आली नाही. त्यामुळे संपूर्ण देश कामाला लागलेला असताना आरबीआयच्या अधिका-यांनी बँकांकडे रक्कम पाठवली नाही,असा आरोप उटगी यांनी केला. तसेच संबंधित प्रकाराची चौकाशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे लोकमतशी बोलताना सांगितले.
उटगी म्हणाले, काळा पैसा बाहेर यावा,भष्टाचार कमी व्हावा आणि दहशतवादाला आळा बसावा या उद्देशाने केंद्र शासनाने नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यात राष्ट्रीयकृत बँकांसह सर्व सहकारी बँकांनीही सहकार्य करण्याची भूमिका दाखवली. मात्र अनेक बँकांकडे पैसेच पोहचलू शकले नाही. परिणामी नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे ज्या अधिकारी घेतलेल्या सुट्टीमुळे बँकांपर्यंत पैसे पोहचू शकले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.