उद्धव ठाकरे भेटीसाठी रवींद्र गायकवाडांची एक्स्प्रेस शिवसेना भवनात
By Admin | Updated: April 8, 2017 14:41 IST2017-04-08T14:35:51+5:302017-04-08T14:41:01+5:30
एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यानंतर वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे

उद्धव ठाकरे भेटीसाठी रवींद्र गायकवाडांची एक्स्प्रेस शिवसेना भवनात
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यानंतर वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. शिवसेना भवनात जाऊन रवींद्र गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विशेष म्हणजे एअर इंडियाने प्रवासबंदी उठवली असताना खासदार गायकवाड राजधानी एक्स्प्रेसनं मुंबईत पोहोचले. शनिवारी सकाळीच ते मुंबईत पोहोचले.
हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लेखी आदेशानुसार शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी एअर इंडियाने तत्काळ प्रभावाने हटवली आहे. मात्र तरीही गायकवाड रेल्वेनेच दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले.
मुंबई - दिल्ली प्रवासात अडकलेले रवींद्र गायकवाड शिवसेना पक्षप्रमुखांची भेट कधी घेणार असा प्रश्न विचारला जात होता. अखेर आज सकाळी गायकवाडांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अगोदर‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र शिवसेना भवनात त्यांची भेट झाली.
काय आहे प्रकरण -
खासदार रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे ओपन तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या स्वीय सचिवाला देण्यात आली होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.
विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत चपलेने मारले.
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली होती.
या घटनेनंतर भारतीय विमान संघानं रवींद्र गायकवाडांवर बंदी घातली आहे. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्या कृत्याचा जाहीर निषेध करत त्यांना नो फ्लाय यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला टाटा समूहातील कंपन्यांनीही पाठिंबा दर्शवला असून त्यामुळे व्हिसारा आणि एअर एशियाच्या विमानांमध्येही रविंद्र गायकवाडांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.