Ravindra Dhangekar News: काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. २०२३ च्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. शिवसेनेचा नगरसेवक म्हणून मी १० वर्षे काम केले आहे. परिवारामध्ये पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. आता जुन्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा काम करण्याचा प्रवास सुरू होत आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी पक्षप्रवेश करताना दिली होती. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रवींद्र धंगेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मोठे दावे केले. यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
रवींद्र धंगेकर एक चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांनी विकास कामे करण्यासाठी शिंदे गटात जात असल्याचे सांगितले आहे. कोणती शैक्षणिक की समाज उपयोगी कामे थांबली आहेत म्हणून निघाले आहेत? शिंदे गटात, अजित पवार यांच्या पक्षात हे जे प्रवेश सुरू आहेत, हे प्रवेश भीतीपोटी सुरू आहेत. रवींद्र धंगेकर खरेतर का गेले हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरुन सांगायला पाहिजे. खरोखर कामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेश पेठेत एक जागा आहे, ही प्रतिभा रविंद्र धंगेकर आणि पार्टनर इतरांच्या नावावर आहे. त्या जागेची किंमत ६० कोटी रुपये आहे. ही जागा विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकी काळात भाजपाने मुस्लिम समाजातील काही लोकांना हाताशी धरुन कोर्टात गेले. त्यात त्यांचे काम अडवण्यात आले, प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवली. त्यांच्या पत्नीच्या अटकेच्या भीतीने आमचे प्रिय रवींद्र धंगेकर शिंदे गटात गेले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. यावर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना भाजपाने त्रास दिल्याची कबुली दिली आहे.
हो, भाजपाने त्रास दिला, कोणाच्याही दबावला बळी पडणार नाही
रवींद्र धंगेकर यांनी सांगितले की, कर्ज काढून गणेश पेठेतील जागा विकत घेतली होती. त्या व्यवहारात कोणतीही फसवणूक नव्हती. तरी भाजपाच्या लोकांनी त्या कामात अडथळा निर्माण केला. वक्फ बोर्डाची जागा असेल तर मुस्लीम बांधवांनी आक्षेप घेतला पाहिजे. पण भाजपाचे लोक आक्षेप घेत आहेत. यातून मला अडकविण्याचे त्यांचे धोरण असल्याचे दिसून येते. ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचे सांगून माझ्या पत्नीला अटक करण्याचा प्रयत्न झाला. मला त्रास दिला गेला असला, तरी पक्ष बदलण्याचे कारण हे नाही, वेगळेच आहे. मी कुणाच्याही दबावाला बळी पडणारा नाही. मी विकास कामांसाठी शिंदे गटात प्रवेश केला, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले.
विधानसभेला, लोकसभेला हा विषय आला
पुढे बोलताना धंगेकर यांनी सांगितले की, विधानसभेला, लोकसभेला हा विषय आला. राजकीय लोकांनी मसाला भरुन यात मला अडचणीत आणण्याच काम केले. मी या त्रासाला शून्य टक्के घाबरतो. हा विषय सात-आठ महिन्यांपासून आहे. माझी कोंडी वगैरे कोणी केली नाही. ते संजय राऊतांचे मत आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.