Ravindra Chavan : मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन रविवारी शिर्डीत होत असतानाच पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदी तूर्तास चंद्रशेखर बावनकुळे कायम राहणार असले तरी दोन महिन्यांनी संघटनात्मक निवडणुकीनंतर चव्हाण पूर्णवेळ अध्यक्ष होतील.
चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला नव्हता, तेव्हाच त्यांना प्रदेशाध्यक्ष करणार हे स्पष्ट झाले होते. चव्हाण हे डोंबिवलीचे (जि. ठाणे) आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. ते पक्षाचा मराठा चेहरा आहेत. अलिकडेच त्यांची पक्षाच्या संघटन पर्वाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आज त्यांची कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली.
‘एक व्यक्ती, एक पद’ बावनकुळे यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे महसूल मंत्रिपद देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनंतर चौथ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांना स्थान देण्यात आले. भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ असा नियम आहे. त्यानुसार बावनकुळे यांच्या जागी आता संघटनात्मक निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर रवींद्र चव्हाण हे पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष होतील. अलिकडील काही वर्षांमध्ये कोकणात भाजप मजबूत करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.