विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रत्नागिरीही खारीचा वाटा उचलणार
By Admin | Updated: December 10, 2014 23:52 IST2014-12-10T22:35:33+5:302014-12-10T23:52:10+5:30
राज्य शासनाच्या सहयोगाने जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बियाणे पुरवण्यात येणार

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रत्नागिरीही खारीचा वाटा उचलणार
रहिम दलाल - रत्नागिरी -समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील स्थिती समाधानकारक असताना आता जिल्ह्यातील शेतकरी विदर्भ, मराठवाड्याचे अश्रू पुसणार आहे. राज्य शासनाच्या सहयोगाने जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बियाणे पुरवण्यात येणार असून त्याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातील भुकेने व्याकूळ जनावरांना होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी जनावरांसाठी चारा उगवून ते दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी पुरवठा करणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात येणार आहे़ दुष्काळगस्त जिल्ह्यांना वैरण पुरवठा केल्यानंतर त्यातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल तर भुकेने व्याकूळ विदर्भ, मराठवाड्यातील जनावरांना चारा मिळेल. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून वैरण बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे़ त्यासाठी पशुसंवर्धन विभाग जिल्हा वार्षिक योजनेकडे ७ लाख रुपयांची मागणी करणार आहे़ एक एकरच्या क्षेत्रात चारा उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर ६०० रुपयांच्या वैरणाच्या बियाणांचा किंवा ठोंब्याचा पुरवठा करण्यात येणार आहे़ दुष्काळग्रस्त गावांमधील पशुधनाला आवश्यक तो चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी वैरण बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून तसे परिपत्रक काढले आहे़ या शासन निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे़ त्यामुळे १०० टक्के अनुदानातून येथील शेतकरी जनावरांसाठी चाऱ्याचे उत्पादन करणार आहेत़
जिल्ह्यात १०० टक्के अनुदानातून शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येणार आहे़ त्यातून अतिरिक्त चारा उगवून टंचाईग्रस्त, दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने मागणी केल्यास चारा पुरवठा करण्यात येईल़
-डॉ़ एस़ सी़ म्हस्के,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
चारा लागवडीने दुष्काळग्रस्त जिल्ह्याला पुरवठा करणार.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन.
स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तर विदर्भवासीयांना चारा.