रत्नागिरी : बालेकिल्ल्याचे खरे वारसदार समजणार!--सिंधुदुर्गातील बहुरंगी---

By Admin | Updated: September 26, 2014 23:34 IST2014-09-26T22:18:16+5:302014-09-26T23:34:13+5:30

भास्कर जाधव यांच्यासमोरील अडथळा दूर--सावंतवाडीचा आमदार कोण

Ratnagiri: The true heirs of the cottage? - The multi-colored syndhund | रत्नागिरी : बालेकिल्ल्याचे खरे वारसदार समजणार!--सिंधुदुर्गातील बहुरंगी---

रत्नागिरी : बालेकिल्ल्याचे खरे वारसदार समजणार!--सिंधुदुर्गातील बहुरंगी---

रत्नागिरी : अखेर शिवसेना - भाजप आणि काँग्रेस - राष्ट्रवादीने काडीमोड घेत स्वबळ आजमावण्याचा निर्णय जाहीर केलाच. या निर्णयामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार, हे निश्चित झाले आहे. अर्थात युती-आघाडी तुटण्याबरोबरच नेत्यांचे पक्षांतर हा विषयच अधिक गाजण्याची शक्यता आहे. आता चारही पक्ष आमने-सामने येत असल्यामुळे प्रत्येक पक्षाची खरी ताकद किती आहे, कोकण कोणाचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्याचे खरे वारसदार कोण आहेत, हे स्पष्ट होणार असल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आले आहे.
युती तुटण्याची घोषणा झाली, शिवसेना-भाजप एकमेकांविरूद्ध लढणार असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याचबरोबर रत्नागिरीचे आमदार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आजघडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि गुहागर हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. आता सामंत शिवसेनेत गेल्यामुळे राष्ट्रवादीची पीछेहाट होणार आहे. अर्थात भास्कर जाधव आणि शेखर निकम हे राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार असल्यामुळे त्यांच्याकडून पक्षाला अधिक अपेक्षा असतील.
काँग्रेसची ताकद राजापूर आणि दापोली मतदारसंघात आहे. पण, या दोन्ही ठिकाणी केवळ स्वत:च्या ताकदीवर निवडून येण्याइतकी काँग्रेस सक्षम नाही. निवडून येण्यासाठी काँग्रेसला मदतीची गरज आहे. रत्नागिरी, चिपळूण आणि गुहागर मतदार संघात काँग्रेसची ताकद कमी आहे.
काँग्रेसप्रमाणेच भाजपची ताकदही कमी आहे. रत्नागिरी आणि गुहागर हे दोन पूर्वापार मतदारसंघ भाजपकडे असले तरी या दोन ठिकाणी भाजपकडे स्वबळावर निवडून येण्याची ताकद नाही. आतापर्यंत शिवसेनेच्या सहकार्यामुळेच या दोन ठिकाणी भाजपचा निभाव लागत होता.सर्व पक्षांमध्ये तळागाळापर्यंतची ताकद आहे ती शिवसेनेकडेच. त्यातच गणपत कदम, सुभाष बने यांनी पुन्हा एकदा शिवबंधन बांधून घेतले आहे. जिल्हा परिषदेच्या ५७पैकी २५ जागा शिवसेनेकडे आहेत. १९ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. ८ जागी भाजप. तर केवळ ३ जागी काँग्रेस आहे. पंचायत समितीमध्येही ११४ जागांपैकी ५८ जागा शिवसेनेकडे आहेत. ३८ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. भाजपकडे ६ आणि काँग्रेसकडे ८ जागा आहेत. जिल्हा परिषदेच्या दोन, तर पंचायत समितीच्या चार जागा अपक्षांकडे आहेत. आकडेवारीत तरी शिवसेना सक्षम आहे. आता हेच चित्र या निवडणुकीत प्रत्यक्षात उतरणार का, हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळेच ही निवडणूक अनेक अर्थांनी अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)




शिवसेनेसाठी राजापूर सोपा
राजापूर : महायुती आणि आघाडीमध्ये फाटाफूट झाल्यामुळे राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहावयास मिळणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता असली तरी युतीच्या फुटीचा म्हणावा तेवढा फटका सेनेच्या उमेदवाराला सहन करावा लागणार नाही. आघाडीतील विभक्तपणाच्या पार्श्वभूमीवर सेनेसाठी ही निवडणूक अतिशय सोपी झाली आह

चिपळुणात चौरंगी लढत चुरशीची

सुभाष कदम - चिपळूण--चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. ही लढत अत्यंत कडवी व चुरशीची होईल. या लढतीचा निकाल अनेकांचे अंदाज चुकविणारा ठरू शकतो.
शिवसेना - भाजप महायुती तुटली आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचा (आठवले) निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्या मागण्या मान्य झाल्या तर ते भाजपबरोबर जातील. तसे झाल्यास भाजपच्या मतात वाढ होईल. परंतु, गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण १८ हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते. तेव्हा आरपीआय आघाडीबरोबर होती. येथे भाजपचा फारसा प्रभाव नाही. चव्हाण यांचा संपर्क आणि विकासकामे याबरोबरच व्यक्ती म्हणूनही चव्हाण यांचा मतदारांवर प्रभाव आहे. त्याचा फायदा त्यांना होणार आहे. आरपीआय त्यांच्याबरोबर राहिली तर चव्हाण यांचा विजय सोपा होईल.

 


भास्कर जाधव यांच्यासमोरील अडथळा दूर
गुहागर : युती व आघाडी तुटल्याने गुहागर मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात काँग्रेस नगण्य असल्याने राष्ट्रवादीला फारसा फरक पडणार नाही. यातूनच युती नसल्याने राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांच्यासमोरील प्रमुख अडचण दूर झाली आहे.
विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भास्कर जाधव यांनी युतीकडील गुहागर पंचायत समिती व गुहागर नगरपंचायत ताब्यात घेतली. मागील पाच वर्षांचा विचार करता शिवसेना व भाजपची स्थिती स्थानिक नेतृत्व नसल्यासारखी निर्माण झाली होती.
मागील निवडणुकीचा विचार करता विनय नातू यांना ३० हजार, रामदास कदम यांना ४० हजार मते अशी एकूण ७० हजार मते युती म्हणून एकत्रित केल्यास भास्कर जाधव यांना मिळालेल्या ५३ हजार मतापेक्षा १७ हजाराने अधिक होतात. जागा वाटपावरुन झालेल्या वादानंतर श्रीधर सेनेच्या माध्यमातून बॅट निशाणीवर विनय नातूंनी निवडणूक लढवली. युतीच्या मतांचे विभाजन होऊन भास्कर जाधव निवडून आले. काँग्रेसचा विचार करता पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी एकट्याने लढली. काँग्रेसने पंचायत समिती निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एकही उमेदवार विजयी झाला. आता युती तुटल्याने शिवसेना - भाजपची मते विभागली जाणार आहेत. याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.

शिवसेनेला राष्ट्रवादीकडून  कडव्या लढतीची अपेक्षा--शिवाजी गोरे -दापोली
दापोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, आता युती तुटली आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याने दोन्ही पक्ष समोरासमोर निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या चार मुख्य पक्षातील उमेदवार पहिल्यांदाच स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात असले तरीही बसपा, मनसे, कुणबी समाजाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने प्रथमच या मतदारसंघात शिवसेनेची कसोटी लागणार आहे.
गेल्या निवडणुकीत सूर्यकांत दळवी यांना ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले. मात्र संजय कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला व शिवसेनेची पडझड होऊन राष्ट्रवादीची ताकद वाढली. तरीही तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना सुस्थितीत आहे. युतीच्या मतविभाजनाचा शिवसेनेवर फारसा प्रभाव पडणार नाही.

सिंधुदुर्गातील लढती होणार बहुरंगी---सावंतवाडी मतदारसंघ ठरतोय सर्वाधिक लक्षवेधी
महेश सरनाईक -कणकवली --युती आणि आघाडीतील घटस्फोटानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. आतापर्र्यत दुरंगी वाटणाऱ्या सिंधुदुर्गातील लढती आता मात्र चौरंगी होणार आहेत. त्यामुळे यात कोण किती पाण्यात आहे याबाबत वस्तुस्थिती लोकांसमोर येणार आहे. त्याचबरोबर कोणाला पक्षाचा ए.बी. फॉर्म मिळून अधिकृत उमेदवारी मिळते याकडेही लक्ष लागून राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. यात कणकवली-देवगड-वैभववाडी या मतदारसंघात भाजपातर्फे प्रमोद जठार, शिवसेनेतर्फे सुभाष मयेकर, काँग्रेसतर्फे नीतेश राणे किंवा विजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अतुल रावराणे हे संभाव्य उमेदवार आहेत.  मालवण-कुडाळमध्ये काँग्रेसतर्फे नारायण राणे, राष्ट्रवादीतर्फे पुष्पसेन सावंत, शिवसेनेतर्फे वैभव नाईक आणि भाजपातर्फे रवी तोरस्कर हे अधिकृत उमेदवार आहेत. बहुचर्चित सावंतवाडी मतदारसंघात षड्रंगी निवडणूक होणार आहे. येथे सेनेकडून दीपक केसरकर, भाजपाकडून अतुल काळसेकर किंवा शिवराम दळवी, काँग्रेसकडून प्रवीण भोसले, राष्ट्रवादीकडून सुरेश दळवी, मनसेकडून परशुराम उपरकर आणि अपक्ष म्हणून राजन तेली असे सहा उमेदवार रिंगणात असतील. त्यामुळे याठिकाणची लढत सर्वात रोमहर्षक आणि लक्षवेधी होणार आहेत.
कणकवलीत खरी लढत आमदार प्रमोद जठार आणि नितेश राणे यांच्यात लढली जाईल असे प्रथम वाटत होते. मात्र, काँग्रेसच्या पहिल्या यादीत नितेश राणे यांचे नाव जाहीर न झाल्यामुळे अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आमदार विजय सावंत हे या जागेसाठी इच्छुक असल्याने आता पक्षाचा ए.बी. फॉर्म कोणाला मिळतो यावर बहुतांशी गणिते अवलंबून राहणार आहेत. जर ए.बी. फॉर्म विजय सावंत यांना मिळाला तर नितेश राणे कुठून लढणार की अपक्ष म्हणून कणकवलीतूनच लढणार हे शनिवारी स्पष्ट होईल. कारण सोमवारी छाननीपूर्वी पक्षीय उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म देणे बंधनकारक आहे.
कुडाळ मालवणचा विचार करता उद्योगमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे वैभव नाईक यांच्यात खरी लढत असली तरी राष्ट्रवादीकडून पुष्पसेन सावंत रिंगणात उतरल्याने याठिकाणी तिरंगी लढत होईल आणि भाजपाने मालवण येथील रवीकिरण तोरस्कर यांना उमेदवारी दिल्याने आता येथे चौरंगी लढत होईल.
सावंतवाडी मतदारसंघ सर्वात लक्षवेधी आहे. महिन्याभरापूर्वी दीपक केसरकर यांचा एकतर्फी विजय होईल, असे भाकीत विश्लेषक व्यक्त करत होते. मात्र, आता सर्वात जास्त उमेदवार या मतदारसंघातच आहेत. सर्व पाच राजकीय पक्षांचे प्रत्येकी एक आणि अपक्ष एक असे मिळून किमान सहा उमेदवार येथे दाखल होणार आहेत. त्यामुळे सावंतवाडीचा आमदार कोण याबाबत आता कोणही भाकित वर्तवू शकत नाही. सिंधुदुर्गातील राजकीय लढाई कधी नाही एवढी ताणली गेली आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे सांगणे कठीण आहे. त्यातच १ आॅक्टोबरनंतरच कोण अधिकृत उमेदवार असेल ते स्पष्ट होईल.

Web Title: Ratnagiri: The true heirs of the cottage? - The multi-colored syndhund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.