रत्नागिरी : अंतर्गत विरोधामुळे जाधव यांना ग्रहण?

By Admin | Updated: October 6, 2014 22:36 IST2014-10-06T21:16:28+5:302014-10-06T22:36:57+5:30

विधानसभा निवडणूक : अंतर्गत हालचालींमुळे धक्कादायक निकाल ?

Ratnagiri: Jadhav accepts internal opposition? | रत्नागिरी : अंतर्गत विरोधामुळे जाधव यांना ग्रहण?

रत्नागिरी : अंतर्गत विरोधामुळे जाधव यांना ग्रहण?

रत्नागिरी : कोकणचे नेतेपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे गुहागर विधानसभा मतदार संघातील उमेदवार भास्कर जाधव यांचे पक्षातील प्रमुख प्रतिस्पर्धी उदय सामंत शिवसेनेत गेले असले तरीही उर्वरित अंतर्गत विरोधामुळे भास्कर जाधव यांना ही निवडणूक अवघड होणार आहे. वरकरणी शिवसेना - भाजपची मते फुटलेली दिसत असली तरी अंतर्गत पातळीवर होत असलेल्या हालचालींमुळे भास्कर जाधव यांचा मार्ग कठीण झाला असल्याचे चित्र दिसत आहे.
१९९५ आणि ९९ साली शिवसेनेकडून आमदार झालेल्या भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या वादामुळे २00४मध्ये शिवसेना सोडली आणि अपक्ष निवडणूक लढवली. त्यात त्यांना अल्प मतांनी पराभूत व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचा मार्ग धरला. आधी ते विधानपरिषद सदस्य झाले. त्यानंतर २00९च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना गुहागरची उमेदवारी दिली. शिवसेना-भाजपच्या भांडणात जाधव यांचा फायदा
झाला.
राष्ट्रवादीकडून प्रथमच विधानसभेत जाताना त्यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले. तेथूनच वादाची खरी ठिणगी पडली. चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्याशी त्यांचे आधीपासूनच वाद होते. मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचे आणि उदय सामंत यांचे जोरदार शीतयुद्ध सुरू झाले.
कोकणचे नेते बनण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने मोठे होण्याच्या वेगात त्यांनी अनेक शत्रू निर्माण केले. उदय सामंत यांच्यापाठोपाठ सुनील तटकरे यांच्याशीही त्यांचे वाद सुरू झाले.
भास्कर जाधव यांचे मंत्रिपद काढून उदय सामंत यांना देण्यात आल्यानंतरही वाद कायम होते. जाधव यांना त्याचवेळी प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जाधव यांनी त्यांच्याशी जवळीक नसलेले काही पदाधिकारी बदलले.
जाधव यांनी केवळ नेतेच नाही तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दुखावले आहे. शिवसेनेत असताना कौतुकास्पद ठरलेल्या त्यांच्या आक्रमकपणामुळे राष्ट्रवादीत मात्र त्यांना अनेक शत्रू निर्माण करून
दिले.
आताच्या घडीला त्यांनी अंतर्गत शत्रू अनेक निर्माण केले आहेत. राष्ट्रवादीचे जे-जे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुखावले गेले आहेत, त्यांची एक फळी जाधव यांच्याविरोधात कार्यरत आहे.
एकीकडे आपल्या पक्षातल्या लोकांना दुखावतानाच जाधव यांनी इतर पक्षातही मोठे शत्रू निर्माण केले आहेत. नारायण राणे यांच्यावर सातत्याने टीका करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे स्वत: राणे आणि माजी खासदार नीलेश राणे दुखावले गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जाधव यांना राणे यांच्याशीही टक्कर द्यावी लागणार आहे. काँग्रेस उमेदवारावरून आणि राणे यांच्यावरून जाधव यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. त्या साऱ्याचा परिणाम या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
युतीची मते फुटल्याने गतवेळी जाधव विजयी झाले. याहीवेळी युती तुटलेली आहे. पण, तरीही युतीच्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे जाधव यांच्या मार्गावर काटेच काटे पसरले गेले आहेत, असे सध्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

जाधव यांच्याविरोधात इतरांची एकी?
अन्य पक्षांतील नेत्यांप्रमाणे स्वपक्षातील शत्रूंचे प्रमाणही मोठेच.
मोठे होण्याच्या वेगामुळे अनेकजण दुखावले गेले.
गुहागरमधील शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या?
जाधव यांच्याविरोधात अनेकजण एकवटल्याची चर्चा.

Web Title: Ratnagiri: Jadhav accepts internal opposition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.