तिढा सुटला, मार्ग सापडला ‘रत्नागिरी गॅस’ची टर्बाईन्स पुन्हा धडधडणार
By Admin | Updated: May 22, 2015 00:15 IST2015-05-21T22:44:12+5:302015-05-22T00:15:06+5:30
अन्य राज्यातील वीज मंडळांशीही चर्चा.-विदेशी इंजिनिअर्स येणार

तिढा सुटला, मार्ग सापडला ‘रत्नागिरी गॅस’ची टर्बाईन्स पुन्हा धडधडणार
श्रीकर भोसले - गुहागर रत्नागिरी गॅस आणि भारतीय रेल्वेमधील वीज खरेदी वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, लिलाव प्रक्रियेतून कमी दरातील गॅस पुरवठादेखील उपलब्ध होणार आहे. कंपनीची अन्य राज्यांच्या वीज मंडळांशीदेखील वीज खरेदीबाबत चर्चा सुरु आहे. तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी गॅसची टर्बाईन्स आता पुन्हा धडधडणार आहेत.सुमारे २५ हजार कोटींच्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचे भवितव्य अंधारात गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. गेली जवळपास दोन वर्षे प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद आहे. प्रकल्पातील यांत्रिक सामुग्री सुस्थितीत ठेवण्यासाठी ठराविक काळाने काही वेळासाठी टर्बाइन्स सुरु केली जात होती. मागील दोन वर्षात टप्प्याटप्प्याने येथील कर्मचारीवर्ग कमी करण्यात येत होता. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पूर्णपणे बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच राज्य सरकारने वीज खरेदी करारही रद्द केल्याने उरलीसुरली आशादेखील संपली होती. एनटीपीसी या कर्मचाऱ्यांनाही कमी करुन कंपनीच्या अन्य ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये सामावून घेण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या लिलावामधून कंपनीला कमी दरात गॅस उपलब्ध होईल. तसेच रेल्वेकडून विजेची मागणी असून, साधारणपणे दर तीन ते चार महिन्यांनी कराराचे नूतनीकरण होईल. ही मागणी ३०० मेगावॅट इतकी असू शकते. कंपनीला उपलब्ध होणाऱ्या गॅसपासून एका टप्प्यातील वीजनिर्मिती होऊ शकते. साधारणपणे ६२० मेगावॅट वीजनिर्मिती होईल. कंपनीतील विविध विभागातील कमी करण्यात आलेल्या कंत्राटी स्थानिक कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दाभोळ प्रकल्पाच्या अस्तानंतर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रत्नागिरी गॅसमध्ये एनटीपीसी व गेलची प्रत्येकी ३२.९ टक्के हिस्सेदारी आहे. राज्य सरकारची १७.४ टक्के, तर दाभोळमधील भांडवली गुंतवणूकदार बँकांची मिळून १६.८ टक्के हिस्सेदारी आहे. विविध कारणांमुळे भवितव्य अस्थिर असलेल्या या प्रकल्पाच्या पुन्हा सुरु होण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रकल्प बंद अवस्थेत असतानाही खर्चाचा गाडा हाकणे ही कंपनी प्रशासनाला तारेवरची कसरत बनली आहे.
विदेशी इंजिनिअर्स येणार
दरम्यान, अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १० अभियंत्यांना एनटीपीसीने परत रत्नागिरी गॅसमध्ये पाचारण केले आहे. मूळच्या दाभोळ प्रकल्पाची यांत्रिक बांधणी करणाऱ्या जनरल इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या विदेशी इंजिनिअर्सची टीमही दाखल होत आहे. ५ जूनपासून कंपनीतील टर्बाईन्स पुन्हा धडधडणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
अन्य राज्यातील वीज मंडळांशीही चर्चा.-
साधारणपणे ६२० मेगावॅट वीजनिर्मिती होण्याचा अंदाज.
रत्नागिरी गॅसमध्ये एनटीपीसी व गेलची प्रत्येकी ३२.९ टक्के हिस्सेदारी.
राज्य सरकारची १७.४ टक्के, तर दाभोळमधील बँकांची मिळून १६.८ टक्के हिस्सेदारी.