पुरस्कारार्थींनी समाज सुदृढ करावा!
By Admin | Updated: August 2, 2014 02:47 IST2014-08-02T02:47:58+5:302014-08-02T02:47:58+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी उभे आयुष्य उपेक्षितांंच्या विकासासाठी घालविले.

पुरस्कारार्थींनी समाज सुदृढ करावा!
नाशिक : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी उभे आयुष्य उपेक्षितांंच्या विकासासाठी घालविले. त्यामुळे पुरस्कारार्थींनी पुरस्कार मिळाले म्हणजे काम संपले असे न समजता समाज सृदृढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार २०१४-१५ च्या वितरण कार्यक्रमात केले.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, आयुक्त रणजितसिंह देओल, सचिव आर. डी. शिंदे, अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर आदी प्रमुख पाहुणे होते.
शिवाजीराव म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक जगातील २७ भाषांत लिहिले गेले आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी दरवर्षी ७५ कोटींची तरतूद करण्यात येते. लहूजी साळवे आयोगाच्या माध्यमातून महामंडळासाठी विकास योजना राबविण्यात येतात. तसेच एकाच वेळी सहा शिष्यवृत्त्या आॅनलाइन देण्यात येऊन त्याचे ३२ लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. मागासवर्गीयांसाठी तीन वर्षांत राज्यात सव्वादोन लाख घरकुले बांधली. जादूटोणा विधेयकास मंजुरी दिली.
महाराष्ट्राला दृष्ट्या आणि क्रांतिकारी नेत्यांची परंपरा आहे. या परंपरेतील रत्नांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिक्षण कमी असतानाही शब्दरूपी निखाऱ्यांतून त्यांनी उपेक्षित समाजामध्ये संघर्षाची जिद्द निर्माण केली, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राज्यमंत्री संजय सावकारे व सचिव आर. डी. शिंदे यांनीही अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडविला. (प्रतिनिधी)