रेशन कार्ड-आधार जोडणीत कोल्हापूर प्रथम
By Admin | Updated: September 24, 2015 01:31 IST2015-09-24T01:31:20+5:302015-09-24T01:31:20+5:30
रेशन कार्ड संगणकीकरणाच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेशन कार्ड हे आधार कार्डाशी जोडण्याचे काम शासनाकडून सुरू आहे

रेशन कार्ड-आधार जोडणीत कोल्हापूर प्रथम
कोल्हापूर : रेशन कार्ड संगणकीकरणाच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेशन कार्ड हे आधार कार्डाशी जोडण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत आजअखेर १३ लाख १३ हजार ९७७ लाभार्थ्यांना जोडत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याखालोखाल १३ लाख १२ हजार ८३९ लाभार्थ्यांचे लिंकिंग करून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी बुधवारी येथे दिली.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रेशन दुकानदार व अंगणवाडी सेविकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आगवणे म्हणाले, रेशन दुकानदारांच्या माध्यमातून अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या लिंकिंगचे काम पूर्ण झाले आहे. केशरी कार्डधारकांचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यांना धान्य मिळत नसल्याने त्यांनी रेशन दुकानांकडे पाठ फिरविल्याने त्यांचे ल्ािंकिंग दुकानदार करू शकलेले नाहीत. त्यामुळे हे काम प्रलंबित राहिले आहे. म्हणून ही जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांना दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक कार्डमागे पाच रुपये याप्रमाणे त्यांना मोबदला दिला जाणार आहे.(प्रतिनिधी)