‘शर्यतीच्या बैलां’नी केला ‘रस्तारोको’
By Admin | Updated: February 19, 2015 01:50 IST2015-02-19T01:50:28+5:302015-02-19T01:50:28+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे.

‘शर्यतीच्या बैलां’नी केला ‘रस्तारोको’
दिघी (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. या शर्यतींविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्याच्या निषेधार्थ चऱ्होली व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने पुणे-आळंदी रोडवर बुधवारी ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
याचिकाकर्त्याने प्राण्यांच्या छळप्रतिबंधक कायाद्यान्वये बैलाच्या शर्यती घेण्यावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावरील युक्तिवादानंतर न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली. शेतकरी बैलाचा छळ
नव्हे, तर प्रेम करतो. ही बाजू पटवून देण्यात शासन कमी पडले, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. बैल काय असतो व त्याच्याबरोबर शेतकरी कसा राहतो, वागतो हे न पाहता संबंधित याचिकाकर्त्याने न्यायालयाची दिशाभूल केली. याचा निषेध करण्यासाठी समस्त चऱ्होली ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने हा ‘रस्ता रोको’ करण्यात आला. येथील ग्रामदैवत वाघेश्वर देवस्थानचा उरुस मंगळवारपासून जोरात सुरू असून, प्रतिवर्षी उत्साहाने बैलगाडी शर्यती घेतल्या जातात. या शर्यती या वर्षी घेता न आल्याने शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.