उत्तर भारतीय एकगठ्ठा मतांसाठी रस्सीखेच

By Admin | Updated: January 21, 2017 02:28 IST2017-01-21T02:28:05+5:302017-01-21T02:28:05+5:30

एकला चलो रेचा काँग्रेसचा नारा यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे

Rashikkech for North Indian Loneliness | उत्तर भारतीय एकगठ्ठा मतांसाठी रस्सीखेच

उत्तर भारतीय एकगठ्ठा मतांसाठी रस्सीखेच

शेफाली परब,

मुंबई- युतीबाबत साशंकता, स्वबळावर शंभर जागा निवडून आणण्याचे भाजपाचे लक्ष्य, मित्रपक्षानेच शिवसेनेसमोर उभे केलेले आव्हान, एकला चलो रेचा काँग्रेसचा नारा यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशा वेळी निर्णायक ठरणाऱ्या उत्तर भारतीय मतांकडे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा वळवला आहे. विविध कार्यक्रम, मेळावे व समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते आपल्या बाजूने वळवण्याचे राजकीय पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
विकासाच्या मुद्द्याबरोबरच जातींचे समीकरण ही निवडणुकीत जमेची बाजू ठरत असते. एखाद्या समाजाची एकगठ्ठा मते पारड्यात पडल्यास त्या पक्षाच्या विजयाचा मार्ग सुकर होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर भारतीयांची लोकसंख्या मुंबईत वाढत आहे. मतदानातही त्यांचा टक्का मोठा असल्याने त्यांची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या पारंपरिक मतदारांवरही भाजपा व इतर
पक्षांनी हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.
>राजकीय पक्षांची नजर
मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये दहिसर, कांदिवली, बोरीवली, मालाड येथील १८, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीमध्ये १८, उत्तर मध्य विभागात विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे, कुर्ला येथे २३, उत्तर पूर्व परिसरात मुलुंड, भांडुप, घाटकोपर, गोवंडी, शिवाजीनगर या ठिकाणी २२, सायन-कोळीवाडा, धारावी तर दक्षिण मुंबईत वरळी, भायखळा, मुंबादेवी, कुलाबा अशा १०७ प्रभागांमधील उत्तर भारतीय मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे राजकीय पक्ष या प्रभागांमध्ये सक्रिय झाले आहेत.
>काँग्रेस पक्षात सर्वाधिक दहा उत्तर भारतीय नगरसेवक आहेत. पारंपरिक मतदार हातून जाण्याच्या भीतीने काँग्रेसने या समाजासाठी स्वतंत्र अजेंडा राबवण्याची तयारी दाखवली आहे. हॉकर योजनेची अंमलबजावणी, १२ हजार उत्तर भारतीयांना टॅक्सीचा परवाना, कांदिवली-चांदिवलीत नेतृत्व उत्तर भारतीयांकडे सोपवण्यात आले आहे.

Web Title: Rashikkech for North Indian Loneliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.