गटनेतेपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच
By Admin | Updated: March 6, 2017 02:17 IST2017-03-06T02:17:02+5:302017-03-06T02:17:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक रविवारी बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली

गटनेतेपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक रविवारी बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या वेळी पक्षाच्या गटनेतेपदासाठी १३ जणांनी इच्छा दर्शविली आहे. या वेळी गटनेता निवडीचे सर्वाधिकार पवार यांना देण्यात आले. मंगळवारी पक्षाच्या गटनेत्यांची निवड होऊन विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली जाईल.
महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४० नगरसेवक निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते या वेळी करण्यात आला. शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते.
गटनेतेपदासाठी वंदना चव्हाण यांनी काही नावे काढून आणली होती. त्याचबरोबर बैठकीमध्ये काहीजणांनी गटनेता बनण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार एकूण १३ जण गटनेते पदाच्या स्पर्धेमध्ये आहेत. यामध्ये प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, दीपक मानकर, विशाल तांबे, चेतन तुपे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, सुमन पठारे, रेखा टिंगरे, सुनील टिंगरे, बंडू गायकवाड यांचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये गटनेता निवडीची प्रकिया पार पाडल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी लागते. त्यानुसार रविवारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता हा पालिकेतील विरोधी पक्षनेता असणार आहे. भाजपाला महापालिकेत मोठे बहुमत मिळाले आहे, त्यामुळे सभागृहात भाजपाशी सामना करण्यासाठी राष्ट्रवादीला सक्षम विरोधी पक्षनेता द्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
>सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू
महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल अनपेक्षित असेच लागले आहे; मात्र जनतेचा कौल आपण स्वीकारला असून, पालिकेच्या सभागृहात सक्षम विरोधीपक्षाची भूमिका आपल्याला पार पाडायची असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी नवनिर्वाचित नगरसेवकांशी बोलताना सांगितले.