‘ब्रह्मनाद’ महोत्सवात रसिक दंग
By Admin | Updated: April 30, 2016 00:48 IST2016-04-30T00:48:58+5:302016-04-30T00:48:58+5:30
दोन दिवसीय ब्रह्मनाद संगीत महोत्सवास रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

‘ब्रह्मनाद’ महोत्सवात रसिक दंग
पुणे : दोन दिवसीय ब्रह्मनाद संगीत महोत्सवास रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. ज्येष्ठ तबलावादक पं. पांडुरंग मुखडे यांचा यंदाच्या ब्रह्मनाद पुरस्काराने गौरव करण्यात आला. ज्येष्ठ गायक पं. बबनराव हळदणकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले.
ब्रह्मनाद महोत्सवात पहिल्या दिवशी समीर सूर्यवंशी यांच्या तबला सोलो वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. कोलकात्याच्या ठुमरी गायिका अल्पना रॉय यांच्या ठुमरी गायनाने बेगम अख्तर यांची आठवण करून दिली. पं. हेमंत पेंडसे यांनी दरबारी राग सादर करून गायनातील तपश्चर्या दाखवून दिली.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात कल्याण अपार यांच्या सनई वादनाने झाली. या सुरेल वादनानंतर पं. भवानी शंकर यांचे शिष्य प्रताप पाटील यांच्या पखवाज वादनाने आसमंत दुमदुमून गेला. त्यांना कुणाल पाटील यांनी उत्तम साथ केली. महोत्सवाची सांगता पं. संजय गरुड यांच्या गायनाने झाली.
श्रीकांत देशपांडे यांनी शिकवलेला राग पुरिया कल्याणमधील ‘आज सो बन’ हा बडा ख्याल, ‘बहुत दिन बिते’ हा छोटा ख्याल अतिशय तयारीने सादर केला. ताना, सरगम, मिंंड इत्यादी वैशिष्ट्ये रसिकांना सादर करून दाखवली. श्रोत्यांच्या आग्रहामुळे बेगम अख्तर यांची ‘बलमवा तुम क्या जानो प्रीत’ ही ठुमरी नजाकतीने सादर केली. पं. भीमसेन जोशी यांच्या ‘बाजे मुरलीया’ आणि भैरवी ‘जो भजे हरि को सदा’ या रचनांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. ब्रह्मनाद पुरस्काराच्या वितरणप्रसंगी पं. विकास कशाळकर, पं. हेमंत पेंडसे, पं. उमेश मोघे, उद्योजक रवींद्र कल्याणकर, बाळासाहेब मानमोडे, विभास आंबेकर, जगदीश थोरवे, हंबीरराव आवटे, कवयित्री अनुजा कल्याणकर आदी उपस्थित होते.