घटस्फोटित तरुणीवर बलात्कार
By Admin | Updated: September 26, 2016 19:38 IST2016-09-26T19:38:46+5:302016-09-26T19:38:46+5:30
दोनदा घटस्फोट झालेल्या २४ वर्षीय तरुणीवर भावाच्या मित्राने शिलाई मशीन मिळवून देण्याचे अमिष दाखवून बलात्कार केला.

घटस्फोटित तरुणीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26 - दोनदा घटस्फोट झालेल्या २४ वर्षीय तरुणीवर भावाच्या मित्राने शिलाई मशीन मिळवून देण्याचे अमिष दाखवून बलात्कार केला. ही खळबळजनक घटना बीड बायपास परिसरातील शहानगर येथे रवीवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरा सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरबेज खान (२९, पत्ता समजू शकला नाही) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी सातारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले की, पीडितेचा दोन वेळा घटस्फोट झालेला आहे. काही महिन्यांपासून ती बीड बायपास परिसरातील शहानगर येथे एकटीच भाड्याने राहते. पीडितेचा मोठा भाऊ हा रिक्षाचालक आहे. तरबेज हा त्याचा मित्र आहे. पीडितेच्या भावाने काही दिवसांपूर्वी पीडितेसोबत त्याची ओळख करून दिली होती. पीडितेचा भाऊ बारापुल्ला गेट परिसरात सहकुटुंब राहतो. उदरनिर्वाहासाठी तिने शिवणकाम शिकून घेतले होते. त्यामुळे तिला शिलाई मशीन खरेदी करायची होती. ही बाब तिने तिच्या नातेवाईकांना सांगितली होती.
दरम्यान रविवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजेच्या सुमारास तरबेज हा पीडितेच्या भावासह रिक्षात शहानगर येथील घरी गेला. यावेळी तिच्या भावाला दुसरे भाडे मिळाल्याने तो रिक्षा घेऊन निघून गेला. त्यानंतर तरबेज आणि पीडिता दोघे घरी एकटेच होते. चहापाणी झाल्यानंतर त्याने तिला शिलाई मशीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखवले. नंतर पीडितेच्या असाह्यतेचा फायदा घेत त्याने घर आतून बंद करून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची कोठेही वाच्यता करू नको, अशी धमकी देत तरबेज पळून गेला. या घटनेनंतर पीडितेने रात्री ९ वाजेच्या सुमारास सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तरबेजचा शोध सुरू केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुशीला खरात करीत आहेत.