पावसासाठी दिला सासऱ्याचा बळी
By Admin | Updated: July 16, 2014 02:55 IST2014-07-16T02:55:58+5:302014-07-16T02:55:58+5:30
‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती... तिच्या हातात कुऱ्हाड होती... तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले.

पावसासाठी दिला सासऱ्याचा बळी
देवानंद पुजारी,फुलसावंगी (यवतमाळ)
‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती... तिच्या हातात कुऱ्हाड होती... तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले. घरात जाऊन बघितले तर सासरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. उमरखेड तालुक्यातील नारळी येथे रविवारी रात्री ही भीषण घटना घडली.
सुमारे अडीच हजार लोकवस्तीच्या या गावात पंचफुला गणेश राठोड ही पती, मुलगा शंकर आणि दक्षता व संतोषी या दोन मुली यांच्यासह राहते. सोबत अंध सासरा वसरामही राहत होता. रविवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन पंचफुला घराबाहेर आली. ‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी, महाराज की जय’ असे ओरडून गावकऱ्यांना सांगत होती.
गावकऱ्यांना प्रथम वाटले की पशुबळी असेल; पण घरात जाऊन पाहिले तर तिचा सासरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिच्या
हातून आणखी काही अनिष्ट घडेल म्हणून गावकऱ्यांनी तिला शिताफीने पकडले. त्यानंतर सरपंच सुभाष राठोड यांनी घटनेची माहिती बिटरगाव पोलिसांना दिली. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी परिसरात पावसासाठी पशुबळी दिले जात असल्याचे सांगितले जाते. हा प्रकार पंचफुलाने बघितला असावा आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली असावी, असे गावकऱ्यांना वाटले.