लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By Admin | Updated: October 25, 2016 22:24 IST2016-10-25T22:24:47+5:302016-10-25T22:24:47+5:30

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करवून घेणा-या आरोपीविरुद्ध जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Rape by marriage bait | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी (वय २२) शरीर संबंध प्रस्थापित करणा-या आणि गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करवून घेणा-या आरोपीविरुद्ध जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रजत किशोरसिंग बावनगडे (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तो गांधीबागमधील अग्रसेन चौकाजवळ राहतो.

पीडित तरुणी इंदो-यातील रहिवासी आहे. ती खासगी कंपनीत कार्यरत असताना वर्षभरापूर्वी आरोपी रजतच्या संपर्कात आली. मैत्रीनंतर या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेऊन या दोघांनी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यांच्यात वारंवार शरीर संबंध प्रस्थापित झाल्यामुळे तिला गर्भधारणा झाली. लग्नाच्या अगोदर तू बाळाला जन्म दिल्यास समाजात बदनामी होईल, अशी भीती दाखवून आरोपी रजतने तिला गर्भपात करण्यास सांगितले.

गर्भपात केल्यानंतर लग्न करू, असे सांगून आरोपीने तिला गर्भपात करवून घेण्यास तयार केले. जरीपटक्यातील एका रुग्णालयात तरुणीचा गर्भपात झाला. त्यानंतर मात्र आरोपीने तिला टाळणे सुरू केले. लग्नालाही स्पष्ट नकार दिला. त्याने विश्वासघात केल्यामुळे तरुणीने रजतविरुद्ध जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Rape by marriage bait