शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार
By Admin | Updated: July 21, 2016 20:08 IST2016-07-21T20:08:31+5:302016-07-21T20:08:31+5:30
शाळकरी मुलीचे (वय १२) अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री इमामवाड्यात घडली.

शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २१ : शाळकरी मुलीचे (वय १२) अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री इमामवाड्यात घडली. या घटनेत एकापेक्षा जास्त आरोपींचा समावेश असल्याचा अर्थात हा सामूहिक बलात्काराचा प्रकार असल्याचा आरोप पोलीस ठाण्यासमोर जमलेला संतप्त जमाव करीत होता. पोलिसांनी मात्र या गुन्ह्यासंदर्भात वाच्यता करण्याचे टाळल्याने सायंकाळपर्यंत गोंधळाचे वातावरण होते.
कोपर्डी प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असतानाच, उपराजधानीत ही घटना घडल्याने पोलीस दलालाही जोरदार हादरा बसला आहे. २० तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही या गुन्ह्यातील आरोपीचा छडा लागला नसल्यामुळे, इमामवाडा परिसरात गुरुवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.
पीडित मुलगी आठवीची विद्यार्थिनी आहे. नेहमीप्रमाणे ती बुधवारी सायंकाळी कराटे प्रशिक्षण वर्गाला गेली होती. वर्ग आटोपून घरी परत जात असताना रस्त्यात तिला एक आरोपी भेटला. ह्यतुझी बहीण माझी मैत्रीण आहे. ती आता इकडेच येत आहेह्ण, असे त्याने तिला फूस लावून मेडिकलच्या मार्गाकडे नेले. तेथे त्याचे दोन मित्र लपून होते. त्यांनी तिला मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. रात्री ११ वाजले तरी मुलगी घरी परत आली नाही. त्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. तेवढ्यातच ती घरी परतली. तिच्या तोंडावर, हातावर खरचटल्याच्या जखमा होत्या. ते पाहून पालकांनी तिला विचारणा केली. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली.
पालकांनी लगेच इमामवाडा पोलीस ठाणे गाठले. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर इमामवाडा पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, सकाळी या घटनेची वार्ता कळताच परिसरातील संतप्त नागरिकांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त सुहास वारके, अतिरिकत आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. गुन्हे शाखेचीही पथके पोहोचली.