अल्पवयीन मुलीवर बोरं देण्याच्या बहाण्यानं बलात्कार
By Admin | Updated: December 26, 2016 20:53 IST2016-12-26T20:48:50+5:302016-12-26T20:53:42+5:30
11 वर्षीय चिमुकलीला बोरं देण्याचे आमिष देऊन तिच्यावर नराधमाने बलात्कार केल्याची घटना सुटाळा बु. येथे उघडकीस आली

अल्पवयीन मुलीवर बोरं देण्याच्या बहाण्यानं बलात्कार
ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 26 - 11 वर्षीय चिमुकलीला बोरं देण्याचे आमिष देऊन तिच्यावर नराधमाने बलात्कार केल्याची घटना सुटाळा बु. येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
तालुक्यातील सुटाळा बु. येथील इंदिरा नगरातील 11 वर्षीय चिमुकली 22 डिसेंबर रोजी दुपारी खेळत असताना गावातीलच रामा विठ्ठल नंदनवार (35) याने तिला बोरं देण्याचे आमिष देऊन गावालगतच्या नाल्यात नेले व तेथे तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या चिमुकलीने ही घटना कुणालाही सांगितली नाही. दरम्यान, काल सकाळी पोटात दुखत असल्याचे तिने काकूला सांगितले. यामुळे तिला तपासणीसाठी गावातीलच एका डॉक्टराकडे नेले असता, हा प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांनी या चिमुकलीवर अतिप्रसंग झालेला असल्याचे सांगितले. याबाबत पीडित मुलीच्या भावाने रविवारी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपी रामा नंदनवार याच्याविरुद्ध कलम 376 (2) (आय)(जे) भादंवि सहकलम 3 (1) (आर) (ड) (डब्ल्यू) अॅट्रॉसिटी कायदा व कलम 4, 8 पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच त्यास काल सायंकाळी माटरगाव येथून अटक केली.