खंडणीखोर भाजप, सेनेला सत्ता देणार?
By Admin | Updated: October 10, 2014 23:34 IST2014-10-10T23:10:59+5:302014-10-10T23:34:27+5:30
अजित पवार यांचा सवाल : सुरेश पाटील प्रचारार्थ सभा

खंडणीखोर भाजप, सेनेला सत्ता देणार?
सांगली : महाराष्ट्रात १९९५ मध्ये भाजप-शिवसेनेच्या हातात सत्ता देऊन जनतेने अनुभव घेतला आहे़ खंडणीखोरांप्रमाणे कारभार करून महाराष्ट्राची पीछेहाट केली होती़ अशा खंडणीखोर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांच्या हातात महाराष्ट्राची पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत मतदारांना केला़ तसेच केंद्रात सत्ता आल्यावर भाजपच्या नेत्यांनी हिंदुत्व सोडले असून, राज्यात सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनाही ते विसरतील, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी लगावला़ राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगलीतील सभेत पवार बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, १९९५ मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला संधी देऊन जनतेने पाहिले आहे़ खंडणीबहाद्दर अशीच या सरकारची ओळख होती़ विकासकामे करण्याऐवजी अधिकाऱ्यांना दमदाटी करून निधी हडप केला़ बदल्यांचा बाजार मांडला होता़ राज्य दिवाळखोरीत काढले़ साडेचार वर्षात केवळ जनतेची दिशाभूल केली़ सध्या मुंबई महापालिकेत शंभर कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे़ त्यांच्याकडे सत्ता असणाऱ्या महापालिकेत घोटाळे आहेत. तरीही प्रसारमाध्यमेही त्यांच्यावर काहीच टीका करीत नाहीत़ येडीयुरप्पांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाली, तरीही त्यांना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केले. असे हे नरेंद्र मोदी आहेत़ याकडे त्यांचे दुर्लक्ष आणि आमच्याबाबत मात्र खोटं पण रेटून बोलत आहेत़
सिंचन योजनांवर चाळीस हजार कोटींचा खर्च आणि ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होत आहे़ पंधरा वर्षातील महाराष्ट्राचे अंदाजपत्रक तीन लाख ७५ हजार कोटींचे आणि भाजपचे नेते आरोप करीत आहेत़ ११ लाख ८६ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा. त्यांच्या खोटेपणाचा आणि खोट्या जाहिरातींचा जनताच पंचनामा करीत आहे़ मतदार मतदानाद्वारेच मराठवाडा-विदर्भवाल्यांना जागा दाखवतील, असा टोलाही त्यांनी गडकरी, फडणवीस यांना लगावला़ माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडे विकासाचे व्हिजन नाही़ जनता त्यांना नाकारणार, याची त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते राष्ट्रवादी उमेदवाराबद्दल अपप्रचार करीत आहेत़ पण, गुलाल सुरेशअण्णांनाच लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)
अजितदादा म्हणतात़़़
मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा मोदींचा डाव
सत्तेत आल्यावर शंभर दिवसात ‘एलबीटी’ रद्द
उध्दव ठाकरे तासाला बदलत असून राज ठाकरेंचे ‘राज’ बदलले
सांगलीत गडबड केल्यास निकालानंतर वाईट परिणाम भोगावे लागतील
महाराष्ट्राच्या योजना गुजरातला पळविल्या
मोदी बारामतीत आले, पण धनगर आरक्षणावर बोलण्याचे टाळले