खंडणीविरोधी पथकाने एकाला घेतले ताब्यात
By Admin | Updated: June 30, 2016 04:19 IST2016-06-30T04:19:29+5:302016-06-30T04:19:29+5:30
पोलिसांना फारसे काही हाती लागले नसले तरी चार दरोडेखोर शेजारच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत

खंडणीविरोधी पथकाने एकाला घेतले ताब्यात
ठाणे : हिरादीप सोसायटीतील चेकमेट या कॅश मॅनजमेंट कंपनीमध्ये मंगळवारी पहाटे दरोडेखोरांनी जवळपास ९ कोटींची रोकड लुटून २४ तास उलटल्यानंतरही पोलिसांना फारसे काही हाती लागले नसले तरी चार दरोडेखोर शेजारच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यानुसार, आता या फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वळवली आहेत. तसेच कंपनीतील सुमारे ८५ कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यांच्या जबानीतसुद्धा तफावत आढळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने रात्री उशिरा एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अवघ्या काही मिनिटांत दरोडेखोरांनी दरोडा टाकून पोबारा केला. आपले कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येऊ नये म्हणून त्यांनी रेकॉर्डरच पळवून नेला. त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले होते. परंतु, जवळील एका इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोर पळून जाताना दिसत आहेत. त्यांच्या हातांत पैशांनी भरलेल्या पिशव्याही स्पष्ट दिसत आहेत. त्यावरून, हेच ते दरोडेखोर असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या दरोड्याच्या तपासासाठी वेगवेगळी १० पथके बनवली आहेत. त्यांना या सीसीटीव्ही फुटेजचा नक्कीच फायदा होणार असून त्यानुसार पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आहेत.
या दरोड्याच्या अनुषंगाने पोलिसांनी बुधवारी कंपनीतील सुमारे ८५ जणांचे जबाब नोंदवले असून काहींच्या जबाबामध्ये तफावत आढळल्याची माहितीही समोर आली आहे. दुसरीकडे ज्या वेळेस कंपनीत दरोडा पडला, त्या वेळेस कंपनीत आॅनड्युटी १७ कर्मचारी होते, तरीदेखील हा दरोडा पडला कसा, असा सवालही आता उपस्थित झाला आहे. तसेच, कंपनीत कुठे सीसीटीव्ही बसवले आहेत, याची माहिती दरोडेखोरांना कशी झाली, याचाही तपास आता पोलीस घेत आहेत. याशिवाय कंपनीची आर्थिक परिस्थितीही तपासली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
>दहा पथके नेमण्यात आली
चेकमेट या कॅश मॅनेजमेंट कंपनीमध्ये मंगळवारी पहाटे दरोडा पडला. या दरोड्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी १० पथके नेमली आहेत. त्यापैकी एक पथक दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी नाशिकला गेले आहे. तर, उर्वरित पथकांमार्फत मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे शहरासह ग्रामीण भागात त्या दरोडेखोरांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.