नागपूर कारागृहातून खंडणी वसुली
By Admin | Updated: April 12, 2015 01:30 IST2015-04-12T01:30:47+5:302015-04-12T01:30:47+5:30
जेल ब्रेक प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला कुख्यात गुंड राजा गौस हा कारागृहात राहूनच साथीदारांच्या मदतीने खंडणी वसुली करीत होता, अशी माहिती उघड झाली आहे.

नागपूर कारागृहातून खंडणी वसुली
नागपूर : जेल ब्रेक प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला कुख्यात गुंड राजा गौस हा कारागृहात राहूनच साथीदारांच्या मदतीने खंडणी वसुली करीत होता, अशी माहिती उघड झाली आहे. प्रॉपर्टी डीलर, व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी वाडी, सक्करदरा, पाचपावली आणि जरीपटक्यात गुरुवारी गुन्हे दाखल झाले. यासोबतच वसूल केलेल्या खंडणीचा वापर त्याने कारागृहातून पळून जाण्याचा कट अंमलात आणण्यासाठी केल्याचेही स्पष्ट झाले.
वाडीच्या धम्मकिर्ती नगरातील प्रॉपर्टी डीलर पप्पू उर्फ समीर नरेंद्र मेंढे (२६) यांना सप्टेंबर २०१४पासून राजा गौस, जुनेद जहिर करिम, अबरार उर्फ राजू भटियारा ऊर्झवाजिद मोहम्मद शेख या तिघांनी वारंवार फोन केले. जुनेद आणि अबरार मेंढेच्या कार्यालयात जाऊन खंडणी मागायचे. त्यांनी सहा महिन्यांत मेंढेकडून ५० हजार रुपये उकळले.
९ एप्रिलला मेंढेंनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. याच तिघांनी सक्करदऱ्यातील व्यापारी ओमप्रकाश प्रभाकर बेतीवार यांना जीवे मारण्याची धमकी देऊन ५५ हजारांची खंडणी उकळली. पाचपावलीतील सय्यद रजाअली मोहम्मद अली (२५) या व्यापाऱ्याला राजा गौस खंडणीसाठी फोन करायचा. रजा अली यांनीही राजा गौसचा साथीदार राजू बढियारा याला १५ हजारांची खंडणी दिली, तर जरीपटक्यातील दयाल सोसायटीत राहाणारे शशी देवीदास उके यांच्याकडूनही राजा गौस आणि त्याच्या साथीदारांनी ५० हजारांची खंडणी उकळली. चौकशीत हे प्रकार उघड झाल्यानंतर गुरुवारी एकाच दिवशी उपरोक्त चार पोलीस ठाण्यांत राजा गौस, जुनेद आणि राजू भटियारा या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
‘लोकमत’च्या वृत्तावर पुन्हा शिक्कामोर्तब
‘लोकमत’ने जेल ब्रेक घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पलायन करण्यासाठी आरोपींनी खंडणी वसूल केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. आता खुद्द पोलिसांनीच या प्रकरणात चार ठिकाणी गुन्हे दाखल केल्यामुळे ‘लोकमत’च्या वृत्तावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.