यवतमाळ ‘मेडिकल’च्या अधिष्ठात्यावर खंडणीचा गुन्हा
By Admin | Updated: November 30, 2014 00:52 IST2014-11-30T00:52:26+5:302014-11-30T00:52:26+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आनंद डोंगरे यांच्यासह स्वच्छता निरीक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत चक्करवार

यवतमाळ ‘मेडिकल’च्या अधिष्ठात्यावर खंडणीचा गुन्हा
२० हजारांच्या मागणीचा आरोप : आवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची तक्रार
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आनंद डोंगरे यांच्यासह स्वच्छता निरीक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत चक्करवार यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दस्तावेजावर स्वाक्षरीसाठी २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. यवतमाळ मेडिकलच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
डॉ. चक्कवार हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मनोरुग्ण विभागात आवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी एका चुकीच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केली. याचाच बागुलबुवा करून डोंगरे यांनी हस्तक स्वच्छता निरीक्षक उमेश गिरमेमार्फत २० हजार रुपयांची मागणी सुरू केली. तगादा लावूनही पैसे मिळत नसल्याने चक्करवार यांच्यावर एकतर्फी कारवाई करत त्यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी डोंगरे आणि त्यांच्या हस्तकाकडून आॅफर देण्यात येऊ लागल्या, अशी तक्रार डॉ. प्रशांत चक्करवार यांनी शहर पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून सदर दोघांविरुध्द भादंवि ३८४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. आनंद डोंगरे हे ३० नोव्हेंबरला सेवेतून निवृत्त होत आहेत. मात्र खंडणीच्या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. यापूर्वीसुध्दा अशा प्रकारची वसुली केली जात होती. मात्र नोकरी वाचविण्यासाठी कोणीच तक्रार करण्यास पुढे येत नव्हते, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे. या प्रकरणात पोलीस तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)