राणेंना वांद्र्याची निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता - अजित पवार
By Admin | Updated: April 18, 2015 19:12 IST2015-04-18T17:05:10+5:302015-04-18T19:12:38+5:30
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत सपाटून मार खावा लागलेले नारायण राणे यांना आपण ही निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

राणेंना वांद्र्याची निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता - अजित पवार
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत सपाटून मार खावा लागलेले नारायण राणे यांना आपण ही निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. या निवडणूकीपूर्वी राणेंशी आपले फोनवरून बोलणे झाले होते, असेही पवार यांनी सांगितले. नुकताच तुमचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला आहे, तसेच वांद्र्याचा मतदारसंघ तुमच्यासाठी नवा आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेतेपद भूषवलेल्या नेत्याने ही निवडणूक लढवणे योग्य नव्हे, असे आपण त्यांना सांगितले होते. मात्र ती पक्षाची नव्हे तर आपली वैयक्तिक भूमिका होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र बेस्ट समितीच्या अ्ध्यक्षपदी असताना आपण या मतदारसंघात काम केले आहे. तसेच या भागात कोकणी मतदारही मोठ्या प्रमाणावर असून ते मला ओळखतात, ते आपल्याला नक्की मतं देतील, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला होता, त्यामुळे त्यांनी ती निवडणूक लढवायचीच असा त्यांचा अंतिम निर्णय होता, असेही पवार यांनी सांगितले. वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंना शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्याकडून मोठ्या मताधिक्याने पराभव स्विकारावा लागला होता.