उद्योगमंत्रीपदाचा सोमवारी देणार राजीनामा - राणे
By Admin | Updated: July 17, 2014 17:10 IST2014-07-17T16:29:48+5:302014-07-17T17:10:22+5:30
लोकसभा निवडणुकीत मुलाचा पराभव झाल्यापासून काँग्रेसवर नाराज असलेले नारायण राणे हे सोमवारी आपल्या उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.

उद्योगमंत्रीपदाचा सोमवारी देणार राजीनामा - राणे
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १७ - लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाचा पराभव झाल्यापासून काँग्रेस पक्षावर नाराज असलेले काँग्रेस नेते नारायण राणे हे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सोमवारी देणार असल्याची माहिती स्वत: राणे यांनी दिली आहे.
उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगतानाच आपण पक्ष सोडणार नसून काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे राणे यांनी सांगितले आहे. राणे हे मंत्रीपदाचा राजीनामा देवून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, उद्योगमंत्री नारायण राणे यांना भाजपाने कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देवू नये, यावेळी भाजपाने युतीचा धर्म पाळावा अशा स्पष्ट शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाकडे मागणी केली आहे.
राणे हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ असून ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळातून ऐकायला मिळत आहेत. राणे विरूध्द शिवसेना हे समिकरण गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. सध्या काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नारायण राणे यांनी भापजामध्ये येण्यासाठी प्रयत्न चालवले असल्याची चर्चा आहे. राणे हे सोमवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती असून ते आपल्या उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेने राणे काँग्रेसमध्ये आले होते मात्र त्यांचे हे स्वप्न सध्या तरी पूर्ण होईल असे दिसत नाही तसेच आगामी निवडणुकांत राज्यात आघाडीचे सरकार येईल ही शक्यता कमी असल्याने राणे हे भाजपात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमिवर उध्दव ठाकरे यांनी भाजपाकडे मागणी केली आहे. राणे यांना भाजपाने पक्षप्रवेश देवू नये यावेळी भाजपाने युतीचा धर्म पाळावा असे सांगायलाही उध्दव ठाकरे विसरले नाहीत. दरम्यान, राष्ट्रवादीत नाराज असलेले छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत येणार का? या प्रश्नांवर उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेना भुजबळांना प्रवेश देणार नाही.