ठाण्यात मोबाइल कंपन्यांना टॉवर्ससाठी रान मोकळे

By Admin | Updated: August 26, 2014 04:03 IST2014-08-26T04:03:50+5:302014-08-26T04:03:50+5:30

मोबाइल टॉवरच्या रेडिएशनचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असताना आजही पालिकाहद्दीत ६०२ अनधिकृत मोबाइल टॉवर आहेत

Rane free for the towers of mobile companies in Thane | ठाण्यात मोबाइल कंपन्यांना टॉवर्ससाठी रान मोकळे

ठाण्यात मोबाइल कंपन्यांना टॉवर्ससाठी रान मोकळे

ठाणे : मोबाइल टॉवरच्या रेडिएशनचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असताना आजही पालिकाहद्दीत ६०२ अनधिकृत मोबाइल टॉवर आहेत. परंतु, आता अनधिकृत मोबाइल टॉवरसह अधिकृत मोबाइल टॉवर उभारणाऱ्यांनाही पालिकेने आपले दार खुले केले आहे. टॉवर उभारणीस आवश्यक आणि अग्निशमन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ना-हरकत दाखल्याकरिता वार्षिक एक हजार भरा आणि टॉवर उभारा, असाच काहीसा फंडा पालिकेने हाती घेतल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
शासनाच्या अधिसूचनेनुसार आता शहरातील अनधिकृत मोबाइल टॉवर अधिकृत करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. या अधिसूचनेनुसार दोन इमारतींमधील अंतर, रेडिएशन, झोपडपट्टी आदींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ ३० हजारांचा दंड आकारून मोबाइल टॉवर आता नियमित म्हणजेच अधिकृत होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून पालिकेने आता मोबाइल टॉवरसंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी शहरातील प्रत्येक टॉवरचा रेडिएशन आॅडिट रिपोर्ट सादर करण्याचेही आदेश मोबाइल कंपन्यांना दिले असून त्यात कुचराई केल्यास पाच हजार ते ५० हजार दंड ठोठावण्याचे ठरवले आहे.
अतिक्रमण विभागाच्या सर्व्हेनुसार शहरात ६०२ मोबाइल टॉवर असून यापैकी एकच टॉवर अधिकृत आहे. यामध्ये सर्वाधिक मोबाइल टॉवर माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत असून येथे १०० टॉवर आहेत. त्याखालोखाल उथळसरमध्ये ७७, वर्तकनगर ७१, प्रभाग ६३, ६४, ६५ मध्ये ५४, रायलादेवी ४७, वागळे ४३, कळवा ४४ आणि कोपरीत ३४ अनधिकृत मोबाइल टॉवर आहेत. यापैकी ४०६ टॉवरना नोटिसा बजावण्यात आल्या. २४१ टॉवर निर्गमित करण्यात आले आहेत. पाच जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. तर पाच जणांनी स्वत:हून टॉवर काढल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली. परंतु, दुसरीकडे कर विभागाच्या माहितीनुसार शहरात ६५१ मोबाइल टॉवर आहेत. मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.

Web Title: Rane free for the towers of mobile companies in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.