राणे भाजपाची ‘बी टीम’!
By Admin | Updated: July 21, 2014 01:05 IST2014-07-21T01:05:10+5:302014-07-21T01:05:10+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला पुन्हा डिवचायचे नाही, महायुतीचे अस्तित्व कायम ठेवायचे आणि पक्षात अंतर्गत कलह निर्माण करायचा नाही, अशा निर्णयाप्रत आलेल्या भाजपाने काँग्रेस नेते नारायण राणे

राणे भाजपाची ‘बी टीम’!
पडद्यामागचे राजकारण : काँग्रेस-राकाँच्या जागा कमी करण्याचे प्रयत्न
गजानन जानभोर - नागपूर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला पुन्हा डिवचायचे नाही, महायुतीचे अस्तित्व कायम ठेवायचे आणि पक्षात अंतर्गत कलह निर्माण करायचा नाही, अशा निर्णयाप्रत आलेल्या भाजपाने काँग्रेस नेते नारायण राणे यांना पक्षात थेट प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत राणे यांनी भाजपची ‘बी टीम’ म्हणून लढावे आणि काँग्रेस-राकाँच्या जास्तीत जास्त जागा पाडाव्यात, असे पडद्यामागचे राजकारण आहे.
लोकसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवाने राणे प्रचंड अस्वस्थ आहेत. काँग्रेसला धडा शिकविण्याचे त्यांनी ठरविले आहे. आपले उपद्रवमूल्य दाखवून देणे एवढेच राणेंचे लक्ष्य आहे. त्यांच्यासाठी शिवसेनेची दारे कायमची बंद आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा नाही. अशावेळी भाजपा हाच त्यांच्यासाठी एकमेव आधार आहे. शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता राणे यांना प्रवेश देण्याबाबत पक्षातील काही ज्येष्ठ नेते सुरुवातीला अनुकूलही होते. परंतु राणे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे पक्षात नवीन डोकेदुखी निर्माण होईल, ही बाब या नेत्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. शिवसेनेचा रोष पत्करून राणे यांना पक्षात प्रवेश देण्यासारखी परिस्थिती नाही, ही जाणीवही भाजपा नेत्यांना आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भाजपामध्ये तुम्हाला न्याय देता येणार नाही’ असे राणे यांना अलीकडेच स्पष्टपणे सांगण्यात आले. हे सांगत असताना ‘आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे’ हे आवर्जून सांगायलाही भाजपा नेते विसरलेले नाहीत. भाजपा नेत्यांना राणे हवेहवेसे वाटतात. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी राणेंची फार मोठी मदत होईल, असे त्यांना वाटते. त्यातूनच एक नवीन ‘अॅक्शन प्लॅन’ आखण्यात आला आहे. या योजनेनुसार, राणे कुठल्याही पक्षात जाणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत ते आणि समर्थक स्वतंत्रपणे लढतील. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा पाडाव्यात. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या वेळी राणेंची मदत घ्यावी, अशी भाजपा नेत्यांची योजना आहे़ आज सोमवारी राणे आपली राजकीय भूमिका जाहीर करतील, त्यात भाजपा-राणे ‘अॅक्शन प्लॅन’चे संकेत मिळतील.
राकाँचे दोन मंत्री भाजपाच्या वाटेवर: राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यातील एक मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील तर दुसरे विदर्भातील आहेत.राष्ट्रवादीचेच आणखी एक हेवीवेट मंत्री भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत़ परंतु तेही राणेंप्रमाणेच महत्त्वाकांक्षी असल्याने घोडे अडले आहे़ याशिवाय काँग्रेसच्या नागपुरातील एका माजी मंत्र्याने भाजप नेत्यांशी संपर्क साधून प्रवेशास इच्छुक असल्याचे सांगितले आहे़
आज राजीनामा
राणे यांना मुख्यमंत्र्यांनी सकाळी १० वाजताची वेळ दिली आहे. त्यावेळी राणे मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील. त्यानंतर दुपारी ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
हात कलम करा!
जर कोणी तुमच्यावर हात उगारत असेल तर त्याचे हात खांद्यापासून वेगळे करा. त्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. कार्यकर्ता शूर असला पाहिजे. न सांगता कराल, तर कौतुक होईल आणि सत्कारही. विरोधकांना जशास तसे उत्तर द्या, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना कणकवलीतील संमेलनात आक्रमक होण्याचे आवाहन केले.
राणेंविरुद्ध दावा ठोकणार -केसरकर
राणे सध्या बिथरले असून माझी व माझ्या कुटुंबीयांची बदनामी चालविली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी रविवारी मुंबईत सांगितले. (सविस्तर/पान ५)