पोलीस दलासाठी घडताहेत रणरागिणी
By Admin | Updated: January 16, 2017 01:24 IST2017-01-16T01:24:49+5:302017-01-16T01:24:49+5:30
‘भारत केसरी’ हा किताब मिळविणारी सोनिका कालिरमण ही पहिली भारतीय महिला.

पोलीस दलासाठी घडताहेत रणरागिणी
संजय माने,
पिंपरी- ‘भारत केसरी’ हा किताब मिळविणारी सोनिका कालिरमण ही पहिली भारतीय महिला. २००३ मध्ये हरियाणात गेलेल्या कुस्तीशौकीन दिनेश गुंड यांना तिची कुस्ती पाहण्याचा योग आला. हरियाणात मुली कुस्ती खेळतात. आपल्या येथे हे का घडू शकत नाही, हा विचार त्यांच्या मनाला शिवला. महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती या मर्दानी खेळाची परंपरा जोपासली गेली. त्या मातीत महिलांसाठी कुस्तीची तालीम सुरू करण्याचा निश्चय त्यांनी केला.
२००६ मध्ये पुण्यातील श्रीक्षेत्र आळंदी येथे त्यांच्या मनातील संकल्पनेला मूर्त रूप आले. महिलांसाठी कुस्तीची तालीम साकारली. लेकीला तालमीत उतरवले. बघता बघता तालमीत मुलींची संख्या वाढत गेली. कुस्तीच्या आखाड्यात अंगाला माती लागलेल्या अनेक तरुणींनी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला अन् पोलीस दलात रणरागिणी होऊन समाजसेवेचा वसाही स्वीकारला आहे.
हरियाणात जगदीश कालिरमण यांची कुस्ती पाहण्यासाठी वडमुखवाडीचे दिनेश गुंड आवर्जून जात असत. जगदीशची बहीण सोनिका हिची कुस्तीतील उत्कृष्ट कामगिरी पाहून ते भारावून गेले. मुलींसाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची प्रेरणा त्यांना तेथूनच मिळाली. अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले. मुलगी अंकिता हिच्यासह अनेक महिला कुस्तीपटू त्यांनी या तालमीत घडविले. तरुणींना पोलीस दलातही नोकरीची संधी मिळाली.
विजया खुटवड, हेमलता घोडके,संपदा आस्वार,आसावरी झेंडे या धडाकेबाज महिला पोलीस अधिकारी आळंदीच्या तालमीतच घडल्या आहेत. त्यांच्यावर आत्मविश्वास,जिद्द, चिकाटी, संयम यासह व्यक्तिमत्त्वाचे अन्य पैलू येथेच पडले. यशस्वी खेळाडूंमुळे पुणे जिल्ह्यातील तरुणींना खेळाबद्दलचे आकर्षण निर्माण झाले आहे. कुस्तीसारख्या मर्दानी खेळात महिलाही कमी नाहीत, हे हरियाणाच्या फोगट भगिनींनी पटकाविलेल्या पदकांनी सिद्ध झाले आहे. त्यावर ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तरुणींचा कुस्ती खेळाकडे कल वाढला आहे.
कुस्तीतील तिसरी पिढी
आळंदीतील तालमीत राज्याच्या विविध भागांतून मुली दाखल झाल्या आहेत. वडमुखवाडीतील गुंड कुटुंबाला कुस्ती या खेळाचा वारसा आहे. आशियाई स्पर्धेत पदक मिळविणारी अंकिता ही आमच्या तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी आहे, असे कुस्ती प्रशिक्षक दिनेश गुंड आवर्जून सांगतात. राष्ट्रीय स्तरावर तिने १२ सुुवर्णपदक मिळवले आहेत.
मनीषा देवकर हिने राष्ट्रीय स्तरावर १२ सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. सोनाली तोडकरने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. अश्विनी मडवी,तनुजा अल्हाट, शीतल साठे, हर्षदा जाधव या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. कुस्तीकडे मुलींचा कल वाढल्याने आळंदीत त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. क्रीडा संघटनांचीही त्यासाठी मदत मिळते आहे.